आपला जिल्हा

हत्तीच्या कळपाने केले घरांचे नुकसान ; भीतीपोटी गावकऱ्यांचे जागरण

धानोरा तालुक्यात हत्तींचा मुक्काम

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २१ ऑगस्ट

आठवडाभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात दाखल झालेले जंगली हत्ती रात्रीच्या सुमारास गावात येत असल्याने गावकऱ्यांना गाव सोडून पळावे लागत आहे. धानोरा तालुक्यातील मर्मा गावात मध्यरात्री हत्तींच्या कळपाने प्रवेश करून तेथील अनेक घरांचे नुकसान केले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकरी रात्र जागून काढत आहेत.

पुरानंतर आता रानटी हत्तीच्या रूपाने जिल्ह्यावर नवे संकट ओढवले आहे. छत्तीसगड राज्यातून जिल्ह्यात जवळपास ३० हत्तींचा कळप दाखल झाल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण आहे. वनविभाग दिवसरात्र या कळपावर नजर ठेऊन आहेत. मात्र, रात्रीच्या सुमारास हे हत्ती जवळील गावात दाखल होत असल्याने त्यांना नियंत्रित करणे कठीण होऊन बसले आहे. मुरूमगाव वनपरिक्षेत्रात सध्या या हत्तींनी बस्तान मांडले आहे. दिवस जंगलात घालविल्यानंतर हा कळप अन्नाच्या शोधात मर्मा गावात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी वनविभागाची चमू उपस्थित होती. गावकऱ्यांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलविले. मात्र, हत्तीच्या कळपाने आठ ते दहा घरांचे नुकसान केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून हत्ती येणार या भीतीने गावकरी रात्र जागून काढत आहेत.

जंगली हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी पश्चिम बंगालवरून चमूला पाचारण करण्यात आले असून ते हत्तीवर लक्ष ठेवून आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!