पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०८ ऑगस्ट
शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात घडली. दुर्योधन जयराम ठाकरे (४९) असे मृतकाचे नाव असून तो गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील रहिवासी आहे.
आरमोरी तालुक्यातील शिवनी येथील दुर्योधन ठाकरे यांची शेती ब्रह्मपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथे आहे. सोमवारी ते आपल्या मुलासोबत शेतावर गेले होते. परत येत असतांना मुलगा बकऱ्यांना चारा तोडण्याकरिता झाडावर चढला. व दुर्योधन ठाकरे हे खाली होते. त्यादरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना फडफडत नेले. मुलाच्या समोर बापाला वाघाने ठार केल्याचे थरारक दृश्य पाहून पूर्णतः घाबरून गेला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी पोहोचून शोधमोहीम राबविली असता ठाकरे यांचा मृतदेह दक्षिण वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये आढळून आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.