सचिवच निघाला धान खरेदी गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार
महसूल विभागाच्य चौकशीतून उघड ; ४ कोटी ५८ लाख रुपयांचे गैरव्यवहार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०४ ऑगस्ट
एटापल्ली तालुक्यात गाजत असलेला ४ कोटी ५८ लाख रुपयांच्या धान खरेदी आर्थिक गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार संतोष पुल्लूरवार असल्याचे महसूल विभागाच्या उच्च स्तरीय चौकशीत पुढे आले आहे. संतोष पुल्लूरवार याने १२३ बिगरशेती व्यक्तींच्या नावे बनावट सातबारा तयार करून ३ कोटी १५ लाख रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. सदर प्रकरणात संतोष पुल्लूरवार कारागृहाची हवा खात आहे.
महसूल विभागाच्या चौकशीत आविका सोसायटी उडेराचा सचिव देवानंद हिचामी याला गैरव्यवहारात एटापल्ली देवा सोसायटीचा सचिव संतोष पुल्लूरवार हा बँक व्यवस्थापनाला सांभाळून मदत करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांचेकडून संतोष पुल्लूरवार याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी समितीने पुल्लूरवार याला एटापल्लीच्या सोसायटीने धान खरेदी व्यवहाराचे तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्याच दिवशी संतोष पुल्लूरवार व देवानंद हिचामी या दोघांचेही धाबे दणाणले आणि दोघांनीही गावातून पोबारा केला. त्यामुळे चौकशी समितीने वेगवान तपासचक्र फिरून संतोष पुल्लूरवार याला गैरव्यवहारात मदत करणारे कोतवाल प्रवीण आत्राम, विशेष पोलीस अधिकारी नागेश बुकपल्लीवार, मधुकर पुंगाटी, यांच्या मदतीने ३ कोटी १५ लाख रुपये व देवानंद हिचामीने १ कोटी ४३ लाख असे ४ कोटी ५८ लाख रुपये गैरव्यवहार केल्यावरून १२ जुलै रोजी संतोष पुल्लूरवार व देवानंद हिचामी यांचे विरुद्ध पोलिसात फिर्याद देऊन गुन्हे दाखल केला.
गैरव्यवहारास मदत करणाऱ्यांच्या खात्यात ३० ते ४० लाख रुपयांचा व्यवहार तर बिगरशेती बनावट सातबारा धारकांच्या खात्यातून ३ ते ४ लाखाचा व्यवहार झाला असून अशा गैरव्यवहारात बँक व्यवस्थापनाचा सहभाग नाकारता येत नाही, त्यामुळे दोन्ही सोसायटी सचिवांनी केलेल्या धान खरेदी गैरव्यवहारात आणखी काही सोसायटी संचालक व बँक व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर घोटाळ्याची पुढील चौकशी उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनात महसूल विभागाच्या चौकशी समिती करीत आहे.