कत्तलींसाठी नेणाऱ्या ३४ गोवंशाची सुटका, चार आरोपी अटकेत
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०३ ऑगस्ट
छत्तीसगडकडील भागातून धानोरा, गडचिरोलीमार्गे चंद्रपूरकडे नेल्या जात असलेल्या गोवंशीय जनावरांचा ट्रक पकडून त्यातील ३४ जनावरांना जीवदान देण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. याप्रकरणी चार आरोपींना अटक करून ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई गडचिरोलीपासून १५ किमी अंतरावर सावरगाव येथे मंगळवारी करण्यात आली.
याप्रकरणी सुरेंद्र सरदार सिंग (रा. नागपूर), विकास संतोष यादव (रा. दहकुसपारा, छत्तीसगड), भोला जीवन गिरी (आदर्शनगर, छत्तीसगड), आणि नितीश योगेंद्र यादव (भवानी बिगार, बिहार) या चार आरोपींना अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रानुसार, गाय, बैल, गोरे अशा जनावरांनी भरलेला दहाचाकी ट्रक गडचिरोलीकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावरगावजवळ पोलिसांनी सापळा लावला. ट्रक क्रमांक एमएच ४०-बीएल-२७०५ हे वाहन थांबवून झडती घेतली असता ३४ जनावरे निर्दयीपणे कोंबून नेली जात होती. त्यातील एका जनावराचा मृत्यू झाला होता. या जनावरांची किंमत १ लाख १२ हजार आहे. ही जनावरे तूर्त लांझेडा येथील कोंडवाड्यात ठेवून चंद्रपूर जिल्ह्यातील गौशाळेकडे रवाना करण्यात आली.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम, सपोनि पूनम गोरे, हवालदार प्रमोद वाळके, खेमराज नवघरे, चंद्रभान मडावी, एकनाथ धोटे आदींनी केली.