आष्टी येथील गाळे बांधकामात भ्रष्टाचार
बांधकामाची चौकशी करा ; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०९ ऑगस्ट
आष्टी ग्रामपंचायतने ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत बांधकाम केलेल्या ४४ नवीन दुकान गाळ्यांचे बांधकाम, गाळ्यांचे विस्तारीकरण इत्यादी कामामध्ये भ्रष्टाचार केला असून या कामाची जिल्हास्तरावरून फेरचौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, आष्टी शहर अध्यक्ष राहुल डांगे, जिल्हा उपाध्यक्ष नेमाजी भोगरे, सरचिटणीस विवेक खोब्रागडे उपस्थित होते.
१ कोटी १८ लाख रुपयांच्या या कामासाठी ई-निविदाच काढली नाही. त्यामुळे मर्जीतील कंत्राटदाराकडून हे काम करवून घेण्यात आले. विशेष म्हणजे आराखड्यात प्रत्येक गाळ्याला ४ स्वतंत्र भिंती दाखवण्यात आल्या. प्रत्यक्षात दोन गाळ्यांच्या मधात संयुक्त भिंत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तत्कालीन प्रभारी ग्रामविकास अधिकारी इंद्रावण बारसागडे यांनीच हा प्रताप केला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे चौकशीची मागणी केली.
यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बीडीओनी चौकशी समिती बसविली होती. मात्र त्यातील सदस्य असलेल्या लेखाधिकाऱ्यांची त्या अहवालावर सहीच नव्हती. लेखाधिकारी महिनाभराच्या सुटीवर गेल्या. त्यामुळे अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्हास्तरावरून पुन्हा चौकशी समिती गठीत करून वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा अशी मागणी राहुल डांगे यांनी यावेळी केली.