पूरग्रस्त कुटुंबांना जागा उपलब्ध करून पुनर्वसन करा
सिरोंचातील पूरपीडितांची तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०२ ऑगस्ट
जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून प्राणहिता व गोदावरी नदी वाहते. गोदावरी व प्राणहिता नदीच्या पुराचे पाणी सिरोंचा शहरासह अनेक गावात शिरले. यामुळे शेती सह घरांचे मोठे नुकसान झाले. ते बेघर झाले. अशा बेघर झालेल्या सिरोंचा येथील पूरग्रस्तांनी विठ्ठलेश्वर मंदिर परिसरात तर काहींनी राष्ट्रीय महामार्गावर झोपड्या बांधून आश्रय घेतला आहे. दरवर्षीचीच ही समस्या असल्याने पूरग्रस्त कुटुंबांना जागा उपलब्ध करून घरकूल देत पुनर्वसन करावे, अशी मागणी पूरग्रस्तांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली.
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा येथील वॉर्ड क्र. ६ विठ्ठलेश्वर मंदिर वॉर्डात आम्ही कुटुंबासह वास्तव्यास राहतो, परंतु या वर्षी जुलै महिन्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला महापूर आल्याने अनेकांच्या झोपड्या वाहून गेल्या व घरांची पडझड झाली. परिणामी १० ते १५ कुटुंबे बेघर झाली. सध्या सर्व कुटुंबे विठ्ठलेश्वर मंदिर परिसरात उघड्यावर निराश्रितांचे जीवन जगत आहेत. सर्व कुटुंबांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. महापुरात झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. त्यामुळे कायमचा उपाय म्हणून सुरक्षितस्थळी जागेसह घरकूल मंजूर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. निवेदनावर लक्ष्मी जिल्लेला, बायका गम्पा, सुनीता कम्बागोणी, लक्ष्मी येरोला, कुसुम मंडल, शारदा येरोला, कावेरी येरोला, भाग्यवती गम्पा, ज्योती रामगिरी, समक्का गरगुरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या
सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस तसेच धान पिकाचीही लागवड केली जाते. तालुक्यात नद्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. कापसासह धान पीकही सडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशीही मागणी निवेदनातून केली आहे.