देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते रस्ता आणि पुलांचे लोकार्पणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि . १ जानेवारी २०२५
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अतिदुर्गम गर्देवाडा भागात गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग आणि ताडगुडा पुलाचे लोकार्पण केले. उल्लेखनीय आहे की गट्टा ते तोडगट्टा हा प्रमुख जिल्हा मार्ग ३५ किमी लांब असुन एल. डब्ल्यू. ई. च्या निधीतून निर्माण करण्यात आला. या ३२.६७ किमी लांबीच्या रस्त्यावर गर्देवाडी नदीवरील एका मोठ्या पुलासह आणखी पाच पुलांचे काम २०२३ ते २०२४ या दीड वर्षात पूर्ण करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी प्रचंड विरोध करण्यात आला आणि ११ मार्च २०२३ पासून खदान विरोधात १५० दिवस तोडगट्टा येथे ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर केवळ दीड वर्षात हे काम पूर्ण करून लोकार्पण करण्यात आले. यासोबतच♣ बससेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाॅयड्स मेटल्सच्या राज विद्यानिकेतन सीबीएससी शाळा, काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटल, नव्या क्लोदिंग कंपनी, फॅमिली काॅर्टर्स, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, पोलीस ऑफीसर फॅमिली क्वार्टर्स, जिमखाना व बालोद्यान या विविध उपक्रमांचे उद्घाटन रिमोट च्या सहाय्याने करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली येथील एका कार्यक्रमात सी – ६० जवानांचा सत्कार करण्यात आला.
लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा,पोलीस अधीक्षक निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, राज्य परिवहन महामंडळ विभागाचे अधिकारी तसेच आदी अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. लोकार्पण सोहळा दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.