
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ जुलै
महाराष्ट्रात मागील एक महिन्यापासून अस्तित्वात असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अर्थात ईडीचे सरकार असंवैधानिक असून दोघेही संविधान कायदा, नीती, मूल्य आणि परंपरांना पायदळी तुडवून राज्यात निर्णय घेत आहेत. असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गुरुवारी आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदी गेडाम यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना कोणताही स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली नाही किंवा नियमानुसार ते कोणत्याही पक्षात विलीनही झाले नाहीत. असे असताना एकट्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. संविधानानुसार विधानसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री केले जाते. किंवा एखाद्या छोट्या गटाच्या नेत्याला पाठींबा देऊन मुख्यमंत्री करण्यात येते मात्र शिंदे यांचे बाबतीत असे काही घडले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक आहे. यावर कळस म्हणजे किमान १२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ असल्याशिवाय सरकारला निर्णय घेता येत नसताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच मागील एक महिन्यांपासून निर्णय घेत आहेत ही बाबसुद्धा असंवैधानिक आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
पटोले यांनी सांगितले की मेडीगट्टा बरेजमुळे दक्षिण गडचिरोलीवर पुराचे संकट आले. हे संकट केवळ आसमानी नसून भाजपच्या धोरणाचे सुलतानी संकट आहे. आगामी अधिवेशनात याचा जाब सरकारला विचारला जाईल. संपूर्ण राज्यात अत्यंत विदारक परिस्थिती असताना सरकार दिव्यांग, आंधळे आणि बहिरे आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता पिडीत आहे. याची उत्तरं शिंदे आणि फडणवीसांना द्यावी लागतील.
कॉंग्रेसचे काही नेते भाजपच्या वाटेवर ही केवळ अफवा
एका माजी मुख्यमंत्र्यासह कॉंग्रेसचे काही नेते हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘ ते ‘ म्हणजे भाजपवाले काहीही करु शकतात असे उत्तर दिले. याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पटोलेंजवळचा माईक ओढून मी खुलासा करतो असे सांगत या केवळ अफवा आहेत असे म्हटले. विधानपरिषदेच्या मतदानाचे वेळी ऊशीरा पोहोचल्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.