आपला जिल्हाक्राईम स्टोरी

इंद्रावती काठी भामरागड दलम कमांडर सह अन्य तीन दलम सदस्यांना चकमकीत कंठस्नान

प्रतिकुल परिस्थितीत सी -६० व सीआरपीएफ जवानांची झुंज यशस्वी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि. २३ मे 

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पोलीस सी -६० चे जवान व सीआरपीएफ ने ३६ तास केलेल्या नक्षलविरोधी अभियानात  एक दलम कमांडर दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्य अशा एकूण ४ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. अभियानानंतर घटनास्थळावरुन एक एस.एल.आर., दोन ३०३ रायफल व एक भरमार असे एकूण ४ अग्निशस्त्रांसह नक्षल साहित्य जप्त केले आहे.

भामरागड दलम कमांडर सन्नु मासा पुंगाटी, वय ३५ वर्षे, भामरागड दलम सदस्य अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे, वय ३८ वर्षे, दोघेही रा. कवंडे, तह. भामरागड, बिज्यो ऊर्फ विज्यो होयामी, वय २५ वर्षे,रा. पोडीया, गंगालूर एरीया (छ.ग.) आणिकरुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे, वय २१ वर्षे, रा. गोंगवाडा, तह. भामरागड अशी चारही मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत. चौघांवर एकूण १४ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर केली होती. तसेच त्यांचेवर खुन,जाळपोळीसह अनेक गुन्हे दाखल होते.

महाराष्ट्र–छत्तीसगड सिमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नुकतेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने काही माओवादी एकत्र येऊन दबा धरुन बसले असल्याच्या गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या १२ तुकड्या व सिआरपीएफ ११३ बटा. डी कंपनीची १ तुकडी तातडीने गुरुवारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात माओवाद विरोधी अभियानासाठी रवाना करण्यात आली होती.

अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत सदर जंगल परिसरात पोहचून सकाळी ७ च्या सुमारास पोलीस पथकातील जवान जंगल परिसरात घेराबंदी करुन शोध अभियान राबवित असताना, जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले. मात्र माओवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

सदर माओवादविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, कमांडंट ११३ बटा. सिआरपीएफ जसवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० आणि सिआरपीएफ ११३ बटा. डी कंपनीच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले. सन २०२१ पासून गेल्या चार वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८७ कट्टर माओवाद्यांना कंठस्नान, १२४ माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व ६३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात केवळ ४० च्या आसपास नक्षली शिल्लक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!