मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार प्रकरणी तीन ग्रामसेवक निलंबित
संवर्ग विकास अधिकाऱ्यांसह अभियंता, सहायक लेखाधिकारी, ४ ग्रामसेवक, विस्तार अधिकारी अशा १० कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी सह दंडात्मक कारवाई
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २७ एप्रिल
महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील भामरागड, अहेरी व मुलचेरा या तालुक्यातील करोडो रुपयाची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणाऱ्या विशाल चिडे मन्नेराजाराम सुनील जेट्टीवार बोटनफूंडी ता.भामरागड व लोमेश सिडाम तालुका अहेरी या तीन ग्रामसेवकांवर जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी निलंबनाची कारवाई केली असून भामरागडचे संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदुम यांच्यावर कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. नंदकिशोर कुमरे मडवेली, तिरुपती सल्ला येचली, बादल हेमके पल्ली, व दिनेश सराटे ईरुपडूम्मे सर्व तालूका भामरागड या चार ग्रामसेवकांची विभागीय चौकशी करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे पाठविला आहे.
उल्लेखनीय आहे की राज्यातील अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या भामरागड तालुक्याला तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी दत्तक घेतलेल्या या तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार उघड झाल्याने आणि त्याची तक्रार केली गेली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ८ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेला चौकशी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार जिपचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र एस. कणसे यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या सहा सदस्यीय समितीने चौकशी दरम्यान विकास कामावर ठपका ठेवला. यात संवर्ग विकास अधिकाऱ्यांसह लहान-मोठे २० पेक्षा अधिक अधिकारी दोषी आढळले आहेत. या प्रकरणात जवळपास ५.३० कोटींची कामे थेट मंत्रालयातून मंजूर करून आणल्या गेली. यातील ८४ पैकी केवळ ८ कामांची चौकशी केली असता सर्व कामात अनियमितता आढळून आली, तर काही कामे न करताच देयके उचलण्यात आली आहेत.
उल्लेखनीय आहे की नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे आजही भामरागड तालुक्यातील अनेक गावे मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे बऱ्याच गावांना जायला रस्तेसुद्धा नाहीत. अशा परिस्थितीत भमारागड तालुक्यामध्ये मागील दोन वर्षांपासून विकास कामे प्रगतिपथावर आहेत. आदिवासींना सोयी पुरवणे, पूल, रस्ते निर्मितीवर प्रशासनाचा अधिक भर आहे. नेमकी हीच संधी साधून काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये संघटितपणे भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक बाब उजेडात आली होती.
सदर समितीने २४ फेब्रुवारी रोजी चौकशी अहवाल सादर केला. या अहवालानंतर भामरागड येथील गट विकास अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), व ६ ग्रामसेवक प्रथम दर्शनी दोषी आढळुन आले. त्यातील तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले असुन ४ ग्रामसेवक व शाखा अभियंता यांचेवर विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच गट विकास अधिकारी यांचेविरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याकरीता विभागीय चौकशी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. तर तांत्रीक सहाय्यक राकेश गनरप्पू यांना काढुन टाकण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
मुलचेरा व अहेरी पंचायत समिती मधील तक्रारी संबंधाने तांत्रीक बाबीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडुन पुरक चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल. असे जिपच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.