प्राध्यापकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या प्राचार्यांवर कारवाई करा
गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचचे कुलगुरूंना निवेदन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १६ जुलै
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या विविध प्राधिकरणाच्या २०२२ निवडणूकीकरिता आपल्या संकेतस्थळावर मतदारांच्या याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. यात विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक यांची माहिती विद्यापीठाद्वारे मागविण्यात आली होती. मात्र, अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महिती सादर न केल्यामुळे अनेक प्राध्यापकांना निवडणूक लढविण्याच्या व मतदान करण्याच्या न्याय हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. अशा प्राध्यापकांच्या मतदार यादीत समावेश करण्यात यावा व प्राचार्यांनी केलेल्या चुकीसाठी प्राचार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच, यंग टीचर्स असोसिएशन, नुटा संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन या सर्व संघटनांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी ४ जुलै रोजी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही ही मागणी लावून धरली होती. शनिवारी विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या अपिलीय सुनावणीतही गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचने हा मुद्दा उपस्थित करून कुलगुरूंशी चर्चा केली. व ज्या प्राचार्यांनी प्राध्यापकांना मतदानापासून वंचित ठेवले, त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या निवेदनातून केली. यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध प्राध्यापक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.