नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना सांगितले मंत्री धर्मराव आत्राम यांना पाचव्यांदा नक्षलवाद्यांची धमकी
ते त्यांचे काम करतात; मी जनसेवेचे काम करत राहणार धर्मराव आत्राम यांचे प्रत्यूत्तर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ नोव्हेंबर
सूरजागड प्रकल्पासह गडचिरोलीत होत असलेल्या खाण प्रकल्पांना पाठिंबा देऊ नका, अन्यथा परिणामांसाठी तयार राहा, अशी धमकी माओवाद्यांनी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांना दिली आहे. धमकीचे हे सत्र आत्राम यांच्या पहिल्या अपहरणापासुन सुरूच आहे. आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघाचे ते आमदार असून गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.
यासंदर्भात आत्राम यांनी सांगितले की, आपल्याला माओवाद्यांकडून सलग धमकी मिळत आहे. आपण यासंदर्भात सरकारला कळविलं आहे. सातत्यानं धमक्या मिळत असल्यानं पोलिस आणि गृहविभाग आपल्या पद्धतीनं योग्य ती खबरदारी घेत आहे. आपणही व्यक्तीगत पातळीवर स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत आहोत. माओवाद्यांचा गडचिरोलीतील विकासाला विरोध आहे. एटापल्ली तालुक्यात होत असलेले खाण प्रकल्प त्यांना नको आहेत. त्यामुळे ते लोकप्रतिनिधींना धमकावत आहेत.
गडचिरोलीचा परिपूर्ण विकास व्हावा, ही आपल्यासह सरकारचीही इच्छा आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने येथे प्रकल्प आणले जात आहेत. परंतु माओवादी त्याला विरोध करीत आहे. लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्याला अशा धमक्यांना घाबरून चालणार नाही. आपल्याला आपलं काम करतच राहावं लागणार आहे. माओवादी त्यांचं काम करीत आहेत, आपण आपलं काम करीत राहणार आहोत, असे आत्राम यांनी स्पष्ट केले आहे. गृहविभाग आणि गडचिरोली पोलिसांनी आपल्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सध्या जी पोलिस सुरक्षा आहे, त्यात वाढ करायची किंवा कसं याचा निर्णय सरकार घेईल, असे ते म्हणाले.
एटापल्ली तालुक्यात गेल्या २५० दिवसांपासून खाणविरोधी आंदोलन सुरू होते. महाराष्ट्र-छत्तीसगड सिमावर्ती भागात या आंदोलनानं जोर धरला होता. परिसरातील ७० ग्रामसभा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अशात महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवरील माओवादी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी वांगेतुरी येथे पोलिस ठाण्याची उभारणी केली. दरम्यान २० नोव्हेंबरला वांगेतुरीकडं जाणाऱ्या गडचिरोली पोलिस आणि सी-६० कमांडो पथकाने तोडगट्टा येथील २५० दिवस सुरू असलेले शांतता पूर्ण आंदोलन बळाचा वापर करून मोडून काढले. आणि २१ लोकांवर गुन्हे दाखल केले. सध्या एटापल्ली तालुक्यात तणावाचं वातावरण आहे. माओवादी पोलिस आणि सरकारच्या विरोधात सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे.
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत भेट देऊन गेलेत. त्याच रात्री माओवाद्यांनी एकाची हत्या केली होती. अद्यापही माओवाद्यांकडून हे हत्यासत्र सुरूच आहे. मध्यंतरीच्या काळात गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या तीव्र अभियानामुळं हिंसक कारवायांची संख्या घटली होती. परंतु गेल्या चार महिन्यांपासून गडचिरोलीतील माओवादी पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे. सध्या माओवादी दक्षिण गडचिरोलीत अधिक सक्रिय झाले आहेत.