लोह प्रकल्पामुळे येथील नागरिकांचे जीवनमान खालावणार असेल तर नको अशी प्रगती व विकास
दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांचा टाहो

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१० जुलै
आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोह दगडांची वाहतूक करणाऱ्या ट्रक्सच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी झालेली असून इतर प्रवासी वाहनांना अप्रत्यक्ष बंदीच असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूने या वाहनांचीच रांग दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील नागरीक हवालदिल झाले आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “लोहप्रकल्पामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावेल व परिसराची प्रगती होईल”.जर अशीच प्रगती होणार असेल तर नको अशी प्रगती व विकास असे इथल्या नागरिकांनी म्हटले आहे.
लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे आष्टी. आलापल्ली मार्गावरील वाहतूक वारंवार बंद होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसत आहे. ९ जुलै रोजी आष्टी आलापल्ली मार्गांवर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला होता. यामुळे या मार्गावरील एस टी व इतर प्रवासी वाहने बंद होती.
आता पावसाळ्यात ही समस्या रोजचीच झाली असून शाळेत कसे जायचे असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल पालकांनी विचारला आहे. रुग्णांना वेळेवर दवाखान्यात उपचाराकरीता नेणे कठीण झाले आहे. याकाळात जर कोणाची जिवीत हानी झाली तर जवाबदार कोण? हाही एक गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. एवढी मोठी बिकट समस्या असताना मात्र इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मात्र सातत्याने दुर्लक्ष करत असून कंपनीच्या हिताची बाजू घेत आहेत. या मार्गावरील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. यावर पर्याय काढून ही समस्या जर सोडविली नाही तर सर्वसामान्य नागरिकांचे जगने कठिण होणार आहे. यासाठी आणखी मोठे आंदोलन ऊभे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.