डॅा.किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त १५०० युवकांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वितरण
अभिष्टचिंतनासाठी उसळली मोठी गर्दी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१५ जुलै
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार असणाऱ्या डॅा.नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी १५०० युवक-युवतींना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची पुस्तके वाटण्यात आली. यानिमित्त डॅा.किरसान यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमासाठी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आ.अभिजित वंजारी, आ.सुधाकर अडबाले, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.आनंदराव गेडाम, माजी आ.पेंटाराम तलांडी, डॅा.नितीन कोडवते, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अभिष्टचिंतन करताना माजी मंत्री पुरके म्हणाले, आदिवासी जिल्ह्यांमधून आयएएस, आयपीएस झाले पाहिजे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ठेवून तयारी केल्यास यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी युवकांना दिला. यावेळी आ.वंजारी आणि आ.अडबाले यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
सुरूवातीला डॅा.किरसान यांनी प्रास्ताविक करताना या आदिवासीबहुल भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळावी आणि त्यासाठी त्यांना तयारी करण्यासाठी अद्यावत सामान्य ज्ञानाची माहिती असलेले पुस्तक फायदेशिर ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी डॅा.किरसान यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या सत्कार व अभिष्टचिंतन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमाचे संचालन सुनील चडगुलवार यांनी तर आभार प्रदर्शन सतीश विधाते यांनी केले. कार्यक्रमाला सतीश वारजुरकर, प्रकाश ईटनकर, डॅा.चंदा कोडवते, वामनराव सावसाकडे, दामदेव मंडलवार, प्रभाकर वासेकर, राजू कात्रटवार, मनोहर पोरेटी, रमेश चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.