क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांचा दौरा आटोपताच नक्षलवाद्यांकडून युवकाची हत्या

मुख्यमंत्री बुधवारी गडचिरोलीत म्हणाले नक्षलवाद जिल्ह्यातून हद्दपार; हत्या करुन दिले प्रत्यूत्तर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१६ नोव्हेंबर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे भेट देऊन स्थानिक आदिवासी व पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांच्या या दौऱ्यानंतर रात्री भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिनेश पुसू गावडे(२७, रा. लाहेरी ता. भामरागड) असे मृत तरुणाचे नाव असून तो विवाहित असल्याची माहिती आहे.

पेनगुंडा-नेलगुंडा रस्त्यावर दिनेश गावडेचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यानी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात पोलिसाचा खबऱ्या असल्यामुळे दिनेशची हत्या करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

दिनेश गावडे याने त्याच्या मालकीचा ट्रॅक्टर पेनगुंडा येथे कामावर पाठविला होता. त्यावर देखरेख करण्यासाठी तो पेनगुंडा येथे गेला होता. मात्र, मध्यरात्री नक्षलवाद्यानी त्याला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

यासंदर्भात पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी दिनेश गावडेची हत्या नक्षल्यांनी केली असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, तो पोलिसांचा खबऱ्या नव्हता. नक्षलवादी निरपराध नागरिकांना ठार करताहेत, असे नीलोत्पल यांनी सांगितले.
उल्लेखनीय आहे की बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातून नक्षलवादी हद्दपार झाल्याचे म्हटले होते. परंतु त्याच दिवशी रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. धोडराज पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून मृत तरुणाचा मृतदेह आज गुरुवारी सकाळच्या सुमारास शवविच्छेदनसाठी भामरागड येथे नेण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस तपासानंतर दिनेशची हत्या नेमकी कशासाठी करण्यात आली हे स्पष्ट होईल.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!