आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आपले अस्तित्व पुन्हा एकदा दाखवून देईल – काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांना विश्वास
कांग्रेसच्या विभागीय बैठकीसाठी राज्यभरातील कांग्रेस नेते गडचिरोलीत दाखल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२० जानेवारी
केंद्रातील मोदी सरकारने विरोधी पक्षांवर इडी, सीबीआय, इन्कमटॅक्स लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे सांप्रदायिक सद्भावना दुषित केली, जाती धर्मात तेढ निर्माण करीत मनमानी करीत आहेत. आरक्षणाच्या नावाखाली भेदाभेद केला जात आहे. असा आरोप करीत अशावेळी कांग्रेस सांप्रदायिक सद्भाव अक्षुण्ण ठेवणे, समाजमनातील भेदाभेद नष्ट करणे, महागाई, बेरोजगारी जातीय जनगणना, यांसारख्या विविध ज्वलंत समस्यांवर कांग्रेस सकारात्मक काम करुन आगामी लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व पुन्हा एकदा दाखवून देईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी गडचिरोली येथे केला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रमेश चेन्नीथला यांच्यासह केंद्रीय नेते आशिष दुवा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे आदी नेते जिल्हा निहाय बैठकीसाठी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, भाजप जात आणि धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण करीत आहे. राम मंदिराचा इव्हेंट करुन मते जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजात तणाव निर्माण करीत आहे. याउलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढून भाजपच्या जातीयवादा विरोधात मोठे आंदोलन उभे केले. सध्या मणीपूर मधून राहुल गांधींनी काढलेल्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले.
भाजपने अनेक राज्यात ईडी आणि सीबीआयचा वापर करुन नेते फोडून सरकार बनविले. परंतु, काँग्रेस याला घाबरणार नाही. जगात केवळ ६ देशांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो. अन्य देश मतपत्रिकेचा वापर करतात. भारतातही मतदान पत्रिकेचा वापर व्हावा, अशी मागणी चेन्नीथला यांनी केली.
इंडिया आघाडीत अजून जागावाटप व्हायचे आहे. लवकरच ते होईल. यावेळी यावेळी निवडणूकीच्या पूर्वी उमेदवारांची निवड केली जाईल. असे सांगून चेन्नीथला यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीनिशी लढू, असा निर्धार व्यक्त केला. पत्रकार परिषदेला माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार मारोतराव कोवासे, आ. सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ.नामदेव उसेंडी, रवींद्र दरेकर,नाना गावंडे, डॉ. नामदेव किरसान, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, एड.गोविंद भेंडारकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.