उन्हाळी शिबिरात हेडरी परिसरातील 500 मुलामुलींना खेळांसह कलांचे प्रशिक्षण
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन चे आयोजन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२० मे
सामुदायिक विकास उपक्रमांतर्गत लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांच्या वतीने ८ ते १८ मे या कालावधीत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी हेडरी येथे १० दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते. ५०० हून अधिक मुले या शिबिरात उत्साहाने सहभागी झाली. एटापल्ली आणि भामरागड तालुक्याच्या दुर्गम गावांतील मुलांना या शिबिरात विविध खेळांसह कलाप्रकारांचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले.
६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आयोजित या शिबिरात शारीरिक प्रशिक्षण, सर्जनशील शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध देण्यात आल्या. शिबिरादरम्यान मुलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, त्यांच्यात संघभावना जागृत करणे, तसेच त्यांच्या क्रीडा प्रतिभेला उजाळा देणाऱ्या उपक्रमांमध्ये ऍथलेटिक्स, धनुर्विद्या, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, नृत्यकला, हस्तकला आणि चित्रकला यांचा समावेश होता.
दुर्गम भागातून या शिबिरासाठी दररोज येण्या-जाण्यासाठी ९० मुलांच्या प्रवास, निवास आणि जेवणाची सुविधा दिली होती. शिबिरातील सर्व सहभागींना क्रीडा पोशाख प्रदान करून त्यांच्यात सांघिक एकता निर्माण करण्यात आली. शारीरिक कवायतींव्यतिरिक्त शिबिरात पर्यावरण जागरूकता, सुरक्षा प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि रोजगार मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांसोबत संवादात्मक सत्र हे शिबिराचे विशेष आकर्षण होते. या सत्रात पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील करिअरच्या संधी, पोलिस विभागाचे कामकाज, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलिस भरती परीक्षांच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करून प्रेरित करण्यात आले. याव्यतिरिक्त लॉयड्स मेटल्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनी तसेच इतर क्षेत्रांमधील करिअर संधींबद्दल शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
शेवटच्या दिवशी झालेल्या समारोपीय समारंभात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक, स्थानिक नेते, पोलिस अधिकारी आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड मधील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिबिरार्थींच्या प्रभावी कलाकृतींचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. मुलांनी १० दिवसात शिकलेल्या गोष्टींची झलक पाहून पालकांनाही त्यांचा अभिमान वाटत होता. मुलांच्या प्रतिभेची दखल घेत ४७२ मुलांना २.३५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. एकूणच हा कार्यक्रम सगळ्यांसाठी उत्साहवर्धक ठरला.
यावेळी पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, नागूलवाडीचे सरपंच नेवलु गावड़े, उपसरपंच राजू तिम्मा, तोडसाच्या सरपंच वनिता नरोटी-कोरामी, उडेराचे सरपंच गणेश गोठा, बुर्गीचे सरपंच विलास गावडे, बुर्गीचे पोलीस पाटील सौरव कावड़ो, मोहोर्लीचे पोलीस पाटील कोमती गावड़े, कुदरीचे पोलीस पाटील विजय तिम्मा, नागुलवाडीचे पोलीस पाटील माधव गावड़े, पेठाचे पोलीस पाटील दसाजी कोरामी, एकरा खुर्दचे पोलीस पाटील रामा गोटा यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी विशेष उपस्थिती दर्शविली.
मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न- प्रभाकरन
याप्रसंगी बोलताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनचे संचालक बी.प्रभाकरन म्हणाले, “हे शिबिर केवळ निखळ आनंद आणि खेळांसाठी नव्हते, तर ते स्वप्ने, आत्मविश्वास आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया बांधण्याबद्दल होते. मुलांना त्यांच्या आवडी शोधताना आणि नवीन मैत्री निर्माण करताना पाहणे आमच्यासाठीही आनंददायी अनुभव होता. या शिबिरामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास निश्चितपणे वाढला असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.