गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा पूरपरिस्थिती, ४३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
पावसाळ्याच्या ४५ दिवसात २२ दिवस जिल्हा पुराच्या सावटात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १६ ऑगस्ट
मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, तब्बल १९ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे ४३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उल्लेखनीय आहे की यावर्षीच्या पावसाळ्याच्या पहिल्या ४५ दिवसात तब्बल २२ दिवस गडचिरोली जिल्हा पुराच्या सावटात होता.
१४ ऑगस्ट च्या रात्री पासून स्थलांतरीत करण्यात आलेल्यांमध्ये भामरागड येथील २३०, देसाईगंज येथील हनुमान वॉर्डातील ४६, सावंगी येथील ३७, आरमोरी तालुक्यातील वाघाळा येथील ३५, गडचिरोली तालुक्यातील पार्डी व कोटगल येथील ५१ तर सिरोंचा तालुक्यातील करजाई येथील ३७ अशा एकूण ४३१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
मागील चोवीस तासांत जिल्हात सरासरी ३१.४ मिमी पाऊस झाला. कोरची तालुक्यात ६७.७ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल धानोरा तालुक्यात ४५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २१ दरवाजे ३ मीटर ने व १२ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून ६ लाख ०५ हजार ४७५ क्यूसेक्स विसर्ग केला जात आहे. तर तेलंगणातील मेडिगड्डा धरणाच्या ८५ दरवाज्यांमधून ८ लाख ३५ हजार ७९० क्यूलेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा आणि इंद्रावती नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहचली आहे. तर प्राणहिता नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे.
दरम्यान, गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील १९ मार्ग बंद
पुरामुळे गडचिरोली- आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, देसाईगंज-लाखांदूर, वडसा ब्रम्हपूरी, आष्टी-गोंडपिपरी, आष्टी-आलापल्ली, सिरोंचा कालेश्वरम, कुरखेडा-वैरागड, देसाईगंज-कोकडी-अरततोंडी, कोरची-भिमपूर बोटेकसा, कोरची-मसेली-बेतकाठी, कुरखेडा वैरागड, वैरागड-पातलवाडा, एटापल्ली परसलगोंदी, लाहेरी-बिनामुंडा, अहेरी-लंकाचेन, अहेरी-वट्रा, अहेरी-देवलमरी, भेंडाळा-गणपूर-अनखोडा इत्यादी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.