गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये १६ जुलै पर्यंत राहणार बंद

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १३ जुलै
हवामान खात्याने १३ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला होता. गेल्या चार-पाच दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे दक्षिण गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून ती अजूनही कायम आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १६ जुलैपर्यंत शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
मागील २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ७८.१ मिमी पावसाची नोंद झाली. भामरागड तालुक्यात सर्वाधिक १६० मिमी पाऊस पडला. तसेच सिरोंचा तालुक्यात १३८.३ मिमी, अहेरीत १३३.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर अहेरी मंडळात तब्बल ३२३.२ मिमी पावसाची नोंद झाली. दक्षिण गडचिरोलीत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे १८ गावातील २१०३ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून प्राणहिता, गोदावरी नदीमधील वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे नदीकाठी असलेल्या अहेरी व सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. संततधार पावसामुळे ७ घरांची अंशतः तर काही घरांची पूर्णतः पडझड झाली आहे.
१३ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १० जुलैला आदेश जारी करुन १३ जुलैपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. त्यानंतर सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांना पूर आला असून, कित्येक मार्ग बंद आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी नवा आदेश जारी करुन शाळा, महाविद्यालये आणि खासगी आस्थापना १६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बुधवारी जारी केले आहेत. मात्र, सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे
जिल्ह्यात पूरपरिस्थिती बुधवारी सुद्धा कायम असून मेडीगट्टा बरेज चे सर्व दरवाजे उघडले आहे. यामुळे सिरोंचा तालुक्यात शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद आहे. तसेच अहेरी-भामरागड, सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली ते नेमडा, कंबालपेठा ते टेकडा चेक आणि पर्सेवाडा-चिकेला- जाफराबाद येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्याने सदर मार्ग पूर्णतः बंद आहेत. तसेच गडचिरोली तालुक्यातील साखर-चुरचुर, अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्ली, देवलमारी ते अहेरी आणि धानोरा तालुक्यातील पेंढरी ते बोटेहुर मार्ग नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाले. भामरागड तालुक्यात दूरसंचार सुविधा ठप्प पडली आहे.