जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द ; प्रकल्प कार्यालयात शासनाचे आदेश धडकले
पुढील आठवड्यात विद्यार्थी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होणार - अरुण एम.,प्रकल्प अधिकारी गडचिरोली
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १८ ऑगस्ट
माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेद्वारा संचालित जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केल्या गेली आहे. सदर संदर्भिय पत्र सोमवारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय गडचिरोली ला प्राप्त झाले आहे. अशी माहिती प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
उल्लेखनीय आहे की जपतलाई आश्रमशाळेत ९ ऑगस्टच्या रात्री पटेरी मण्यार या विषारी सापाच्या चावण्यामुळे तीन विद्यार्थीनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आणि तीन मुलींना काहीशी विषबाधा झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्या संदर्भातील आदेश सोमवारी प्रकल्प कार्यालयात पोहोचले.
शाळेची मान्यता रद्द झाल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी जिल्ह्यातील तीनही प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून एक आठवड्यात ती पूर्ण करण्यात येईल असेही प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांनी सांगितले. ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या गावाजवळ जी शासकीय आश्रमशाळा आहे, त्यात या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पूढील शिक्षणावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. याची काळजी घेतली जात आहे. समायोजित विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या परिपूर्ण सोयी सुविधा तातडीने पुरविल्या जाणार आहेत.



