विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी राखी, हिरापूर, गुरवळा येथील विद्यार्थ्यांचे चौथ्या दिवशीही बहिष्कारास्त्र
शुक्रवारी विद्यार्थ्यांचे शाळेसमोर बसून अभ्यास आंदोलन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ३ जुलै
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, राखी, गुरवळा या परिसरातील प्रस्तावित विमानतळाचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हिरापूर आणि गुरवळा या गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांसह मंगळवारी गावातील शाळेसमोर आंदोलन करीत पहिल्याच दिवशी प्रवेशावर बहिष्कार घातला होता. हे बहिष्कारास्त्र शुक्रवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ३० जून पासून शाळा विद्यार्थ्यांविना सुन्या पडलेल्या आहेत. केवळ शिक्षक शाळेत बसून असल्याचे चित्र समोर आले आहे. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी शाळेसमोर बसून अभ्यास आंदोलन केले.

विमानतळासाठी काढलेला शासनाचा जीआर रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेत जाणार नाही. अशी ठाम भूमिका घेत हिरापूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत न जाण्याचा निर्णय घेत शाळेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन केले. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि शिक्षण विभागाने विमानतळाचा किंवा जमीन अधिग्रहणाचा आणि शिक्षणाचा विषय वेगवेगळा असल्याने बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. शुक्रवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी हिरापूर शाळेला भेट दिली. मात्र शाळेसमोर आंदोलनाचे चित्र पाहून कोणाशीही चर्चा न करता माघारी परत गेले. दरम्यान विमानतळासाठी काढलेला शासनाचा जीआर रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेत जाणार नाही. या भूमिकेवर तीनही गावचे ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी ठाम आहेत.


