बनावट ‘प्रमा’ प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करा – आझाद समाज पार्टीची मागणी
तपास पूर्ण होईपर्यंत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ४ जुलै
जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) निधीतील कथित चार कोटी रुपयांच्या प्रशासकिय मान्यता घोटाळ्याच्या तपासाची दिशा आणि व्याप्ती यावर आजाद समाज पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एस आय टी) सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी एका पत्रकार परिषदेतून केली आहे.
बन्सोड यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले की, या प्रकरणाचा तपास सुरू होऊन अनेक दिवस उलटूनही एका आरोपी पलीकडे चौकशीची व्याप्ती वाढलेली दिसत नाही. इतर संभाव्य जबाबदार व्यक्तींची नावे अद्याप समोर आलेली नसल्याने तपासाच्या निष्पक्षतेबाबत जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे केवळ एका आरोपीपुरती चौकशी न ठेवता संपूर्ण प्रशासकीय साखळीचा शोध घेणे आवश्यक आहे. जिल्हा खनिकर्म विभाग यापूर्वीही विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. अशा संवेदनशील विभागात कथित बनावट स्वाक्षऱ्यांच्या आधारे प्रशासकीय मान्यता तयार होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, ती केवळ निष्काळजी पणामुळे घडली असे मानता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारचे व्यवहार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणामागे प्रभावशाली राजकीय व्यक्ती आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साखळीचा सहभाग असण्याची शक्यता फेटाळता येत नसल्याचा आरोप करत, चौकशीचा आवाका वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोपी आशिष पिपरे यांचे राज्यातील काही प्रभावशाली राजकीय नेत्यांशी निकटचे संबंध असल्याची चर्चा आहे. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत, तर स्वतः पिपरे हे काँग्रेस गटातून स्वीकृत नगरसेवक आहेत. भाजपने त्यांची तीन महिन्यांपूर्वी हकालपट्टी केल्याचा दावा केला असला, तरी त्यामुळे जनतेच्या मनातील शंका दूर झालेल्या नाहीत, असे बन्सोड यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कथित आर्थिक गैरव्यवहार घडत असताना संबंधित प्रशासकीय यंत्रणेला त्याची कोणतीही माहिती नव्हती, हा दावा जनतेला पटणारा नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करून चौकशीच्या कालावधीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. जनतेच्या पैशाशी संबंधित या प्रकरणात दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि कोणालाही राजकीय संरक्षण मिळू नये, अशी मागणीही त्यांनी केली. या संदर्भात खनिकर्म महासंचालक, नागपूर यांना निवेदन पाठविण्यात आले असून, मंगळवारी प्रत्यक्ष भेट घेऊनही ही मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही किंवा तपास दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आजाद समाज पक्ष जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशाराही बन्सोड यांनी यावेळी दिला.



