विशेष वृतान्त

प्रशासनाच्या पत्रात ‘तात्पुरती स्थगिती’ असा कुठेही उल्लेख नाही : महेंद्र ब्राह्मणवाडे, ‘जीआर रद्द’ चा अंतिम लढा मुख्यमंत्र्यांच्या दालनात

तात्पुरत्या स्थगितीवर ठिय्या आंदोलन मागे घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाच्या अवस्थेवर शेतकरी नेते ब्राह्मणवाडे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ७ जून 

५ जून ला गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाकडून विमानतळ क्षेत्रातील भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याचे पत्र ठिय्या आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन रात्री उशिरा स्थगित केल्या गेले. यावरून जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले होते आणि आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने शेतकऱ्यांना ठिय्या आंदोलन स्थळी दिलेल्या पत्रात कुठेही विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचा कुठेही उल्लेख नाही. असा खुलासा शेतकरी संघर्ष कृती समितीचे निमंत्रक शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी रविवारी दुपारी आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगताना त्यांनी सदर पत्राची प्रत पत्रकारांना दिली. यावेळी भूसंपादनाचा जीआर रद्द करणे हीच शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असून सरकारने जर मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांचा पुढील निर्णायक लढा हा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

उल्लेखनीय आहे की शेतकरी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून ४ जून पासून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने प्रस्तावित औद्योगिक प्रकल्प, एमआयडीसी आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी गुरुवारी तीव्र आंदोलन छेडले. शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढत धडकले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्यांसह बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. रात्री हजारो आंदोलकांनी रस्त्यावर जेवण करुन उघड्यावर झोप घेतली. शुक्रवारी सकाळी आपापल्या ठिय्यावर चुली पेटवून सोबत आणलेल्या शिध्याचा स्वयंपाक करुन भर उन्हात आपला निर्धार कायम ठेवला. दरम्यान दुसऱ्या दिवशीही आणखी काही शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले पहावयास मिळाले. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्याचे सह पालकमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन नेमकी मागणी समजून घेतली आणि प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा आंदोलकांशी संवाद साधत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

रात्री उशिरा सह पालकमंत्र्यांनी प्रशासनासोबत आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना सरकार सकारात्मक घेत असुन प्रस्तावित विमानतळ क्षेत्रातील भूसंपादन प्रक्रियेस पूढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत असून चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा केली. यात सर्वत्र माध्यमांमध्ये, ‘ तात्पुरती स्थगिती ‘ असे शब्द प्रयोग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थगीतीचे पत्र मिळाल्यानेच आंदोलन स्थगित केले 

प्रशासनाने स्थगीतीचे पत्र दिल्यानंतरच उपस्थित शेतकऱ्यांशी रात्री चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित केले. एकूणच नैसर्गिक वातावरण योग्य नसल्याने काही आंदोलकांना इस्पितळात दाखल करावे लागले. शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस आल्याने आंदोलकांची काही काळ तारांबळ उडाली. तर दुसरीकडे शेतीच्या हंगामाचा काळ सुरू झाला आहे. अशा वेळी स्थगितीचे पत्र मिळाल्याने परिस्थिती सापेक्ष आंदोलन स्थगित केले. अन्यथा शेतकऱ्यांची पुढील ६ महिने ठिय्या देण्याची तयारी होती. आणि ती पुढेही असणार आहे. भूसंपादनाचा जीआर रद्द करणे हा प्रमुख मुद्दा असून यासाठी शेतकरी सर्व स्तरावर लढा देण्यासाठी तयार आहेत. 

महेंद्र ब्राह्मणवाडे, निमंत्रक शेतकरी संघर्ष कृती समिती गडचिरोली 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!