विशेष वृतान्त

आदिवासींना वनवासी संबोधणाऱ्या केंद्रीय गृहमंत्र्यांचा कुरखेडा येथे निषेध

उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्रीय गृहमंत्र्यांविरोधात केली प्रचंड घोषणाबाजी, आमदार रामदास मसराम यांनी केले नेतृत्व

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.९ जून 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाला ‘वनवासी’ संबोधत मूलनिवासी समूहाचा अपमान केला, असा आरोप करत गृहमंत्र्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत कुरखेडा येथे आदिवासी समाजाने मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या ४५ पोटजातींमधील नागरिक यात सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी केले.

बिरसा मुंडा चौक (नवीन बसस्थानक) ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे जनजाती बांधवांच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला होता. हा शब्द मानहानीकारक असून आदिवासी हा जल, जंगल, जमिनीचा मालक व मूलनिवासी आहे. त्यांना संवैधानिक असलेला आदिवासी हाच शब्दप्रयोग करण्यात यावा, यानिवासी वनवासी या शब्दप्रयोगाबद्दल गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकल्यानंतर उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात आमदार रामदास मसराम, आदिवासी समस्त ४५ पोटजाती समाज संघटनेचे अध्यक्ष तिमेश्वर कोरेटी, रामसुराम काटेंगे, आदिवासी कंवर समाजाचे मार्गदर्शक डॉ.मेघराज कपूर, आदिवासी हलबी जमातीचे जिल्हाध्यक्ष शालीकराम मानकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, संजय कोकोडे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती गिरीधर तितराम, गोविंद टेकाम, शशिकांत मडावी, दिलीप घोडाम, अरुण सोयाम, प्रभाकर जुमनाके, आशा तुलावी, गुलाब सोनकुकरा, श्रीराम दुगा, संध्या नैताम, प्रतिभा सिडाम, निलकंठ आलाम, चिरकुटा नैताम, विजय तुलावी, धरमदास उईके, गणेश काटेंगे, श्रीराम मडावी यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन नाट, जयंत हरडे, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, वसिम शेख, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, परसराम टिकले, तसेच मोठ्या संख्येत आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!