माओवादी भासवून बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २५ जुलै
भामरागड तालुक्यातील पिपली बुर्गी पोलीस स्टेशनच्या हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.
गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद संपुष्टात आला असून गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही माओवादी शिल्लक नाही. गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सातत्याने अभियान राबविण्यात येऊन “ऑपरेशन अंतिम प्रहार” च्या माध्यमातून विशेष शोध मोहीम राबवून गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद्यांची दहशत संपुष्टात आणली आहे. १२ जून रोजी काही अज्ञात व्यक्तींकडून माओवादी असल्याचे भासवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत पत्रके व बॅनर लावण्यात आले होते. मात्र गडचिरोली पोलीस दलाने सदर दहशत निर्माण करणाया दोन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहिम राबविण्यात आली. सदर तपासादरम्यान तांत्रिक पुरावे व गोपनिय बातमीदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे शिवा अनिल मिस्त्री वय ४८ वर्ष, रा. तरुणनगर ता. पाखांजुर जि. कांकेर (छ.ग.) व रोहीत रंज्जीत मल्लीक वय २५ वर्ष, रा. वटेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने माओवादी असल्याचे भासवून सदर पत्रके व बॅनर लावल्याचे निष्पन्न झाले. यावरून गडचिरोली पोलीसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी सदर कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले असून नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये तसेच या प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होवू नये. याप्रकारे कोणीही नागरिकांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.



