देशात शेतकरी आणि आदिवासींच्या शोषणाविरोधात जंतरमंतर पेक्षाही मोठा उद्रेक होईल
कांग्रेसच्या आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विक्रांत भूरिया यांचा घणाघात
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ जुलै
जंतरमंतर वरील आंदोलनात विद्यार्थी आणि तरुणाईच्या भावनांचा जो मोठा उद्रेक झाला आणि त्याचे परीवर्तन स्फोटात झाले. परिणामी सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला. त्याचप्रमाणे देशात शेतकरी आणि आदिवासींचे जे शोषण सुरू आहे. आगामी काळात त्याचाही मोठा उद्रेक होऊन प्रचंड मोठा विस्फोट होईल. त्यावेळी सरकारही त्यातून वाचू शकणार नाही. हे केंद्राने लक्षात घेतले पाहिजे. अशी रोखठोक भूमिका काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विक्रांत भूरिया यांनी गडचिरोलीत घेतली.
ते गडचिरोली जिल्ह्याच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध खनिज प्रकल्पांसाठी व विमानतळासाठी शेतकरी व आदिवासींच्या जमीनी बळजबरीने संपादन करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावातील पिडीत शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन भूमिका समजून घेतली. गडचिरोलीतील विमानतळासाठी सुद्धा बळजबरीने भूमी अधिग्रहणाविरोधात आक्रमक असलेल्या राखी, गुरवळा आणि हिरापूर येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. झेंडेपारसह जिल्ह्यातील सर्वच खनिज प्रकल्प उभारणीच्या संदर्भात सरकार आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अन्याय पूर्ण वर्तनाची त्यांनी दखल घेतली.
मध्यप्रदेशात आंगठे चोरी
वोट चोरी, चंदा चोरी सोबत मध्यप्रदेशात आता अंगुठा चोरी सुरू झाली आहे. आदिवासींच्या जमीन बळकावण्यासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कित्येक वर्षांपूर्वी मृत्यु झालेल्या लोकांचे खोटे आंगठे जमीनीच्या कागदपत्रांवर लावून त्या जमीनींची विक्री करून एका दिवसात फेरफार करण्याचे मोठे कारस्थान सुरू असल्याचा आरोप भूरिया यांनी केला. यातून आदिवासींना बेदखल करणण्याचे षडयंत्र सुरू आहे. यासंदर्भात कांग्रेसने कायदेशीर मार्गाने न्यायालयाचे द्वार ठोठावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कांग्रेस शेतकरी आणि आदिवासींच्या समस्यांवर निरंतर आंदोलनांसह न्यायालयीन लढाई लढेल. हे स्पष्ट केले. पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की कोणत्याही प्रकल्पात स्थानिक लोकांची भागीदारी असली पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना भूमीहीन मजूर बनवल्या जात आहे.
आदिवासी महिला राष्ट्रपती केल्याचे भासवून भाजप आदिवासींचे कैवारी असल्याचा देखावा जरी करीत असला तरी प्रत्यक्षात आदिवासींचा मोहरे म्हणून वापर करीत आहे. देशात सर्वाधिक कुपोषित, अशिक्षित आदिवासी आहेत. नक्षलवाद्यांच्या नावावर आदिवासींना मारले जात आहे. जेलमध्ये डांबले जात आहे. आदिवासींचे पलायन घडवून आणण्याचा मोठा कुटील डाव रचला जात आहे. सरकारकडे नितीमत्ता नावाची गोष्ट उरली नाही. इडी, सीबीआय चा गैरवापर केला जात आहे. देश मागील १३ वर्षांपासून हे बघत आला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. सरकारने जर स्वतःला बदलले नाही तर नजीकच्या भविष्यात या जनक्षोभाचा मोठा विस्फोट हे सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की शेतकरी, आदिवासी, गरीब यांच्या समस्यांच्या संदर्भात कांग्रेस कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. सर्व प्रकारच्या आंदोलनांच्या पाठिशी कांग्रेस खंबीरपणे उभी राहिल.
आदिवासींसाठी कायदे खुप आहेत. परंतु लोकांना विश्वासात घेतले जात नाही. ही शोकांतिका. रक्ताचे पाट वाहिले तरी सुपीक जमीनी देणार नाही. आदिवासी आणि शेतकऱ्यांचे संवैधानिक अधिकार हिरावले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केला.
पत्रकार परिषदेला आरमोरीचे आमदार रामदास मसराम, कांग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष एड. विश्वजीत कोवासे, जि.प.चे माजी अध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जिल्हाध्यक्ष तथा शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे, कुसुम आलाम, सतिश विधाते, रमेश चौधरी, विनोद शनिवारे, निलेश राठोड यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



