भूमी अधिग्रहणाचा जीआर जोपर्यंत रद्द केला जाणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलनातून हटणार नाही; जिल्ह्यातील हजारो शेतकरी बैल बंड्या व कुटुंबियांसह ठिय्या आंदोलन स्थळी दाखल; सुपीक जमिनी अधिग्रहणाविरोधात संताप रस्त्यावर
शेतकऱ्यांच्या निर्धारावर सरकारच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ४ जून
गडचिरोली जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील ” स्टील हब” बनविण्याच्या उद्देशाने प्रस्तावित औद्योगिक प्रकल्प, एमआयडीसी आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र संताप गडचिरोलीच्या रस्त्यावर गुरुवारी दिसून आला. शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी गांधी चौकातून पायी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्यांमधुन आलेल्या हजारो कुटुंबासह बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत भूमी अधिग्रहणाचा जीआर रद्द केला जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थळावरुन हटणार नाही.असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या या निर्धारावर राज्य सरकार काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख्यालय परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. घटनास्थळावर तणावपूर्ण वातावरण असून २५ हजार शेतकऱ्यांची मोठी गर्दी आणि आंदोलनाची संभाव्य तीव्रता लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बैलगाड्या, शिधासामुग्री आणि कुटुंबासह शेतकरी मुक्कामी आंदोलनस्थळी दाखल
सकाळपासूनच गडचिरोलीसह चामोर्शी तालुक्यांतील शेतकरी गांधी चौकात जमा झाले होते. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता गृहीत धरून अनेक शेतकरी बैलगाड्या, अन्नधान्य, पिण्याचे पाणी तसेच स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य घेऊनच आंदोलनस्थळी दाखल झाले. कडक उन्हाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवला.
विविध राजकीय पक्ष व समाज संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघर्ष कृती समितीने गेल्या काही महिन्यांपासून जमीन अधिग्रहणाविरोधात विविध आंदोलनांची मालिका सुरू ठेवली आहे. आंदोलनाला तेली, कुणबी आणि कलार समाजाच्या विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत आहेत.
सुपीक जमिनींच्या अधिग्रहण प्रक्रियेचा तीव्र विरोध
आंदोलनादरम्यान महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी आणि शिरपूरचक परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांनी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला असतानाही शासनाने जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांमध्ये अधिग्रहण प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांशी कोणतीही सविस्तर चर्चा न करता केवळ औद्योगिक प्रकल्पांच्या हितासाठी सुपीक शेती जमीन संपादित केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेती हाच जगण्याचा आधार आहे. सुपीक जमिनी गेल्यास अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतील. यापूर्वी आम्ही सरकारी आदेशाची होळी, मुंडन आंदोलन यांसारखे विविध मार्ग अवलंबले; मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आता हा संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
महेंद्र ब्राह्मणवाडे , शेतकरी संघर्ष समितीचे नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष कांग्रेस


