गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी एड. विश्वजीत कोवासे;
सक्रिय आणि बहुजन समाजातील अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांना हटवल्यामुळे गडचिरोलीत तीव्र नाराजी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२१ मे
कांग्रेस मध्ये मागिल तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक प्रक्रियेनंतर गुरुवारी महाराष्ट्रातील कांग्रेस जिल्हाध्यक्षांच्या केलेल्या घोषणांमध्ये एड. विश्वजीत कोवासे या आदिवासी चेहऱ्याची निवड केली आहे. या घोषणेनंतर कांग्रेस मध्ये जिल्हाभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर खास करून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
निवर्तमान अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे मागिल पाच वर्षांपासून अत्यंत सक्रिय जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांना बहुजन, विशेषतः कुणबी समाजाचा मोठा पाठिंबा होता. विविध आंदोलने आणि व्यापक जनसंपर्क व सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती यामुळे ते पक्षात लोकप्रिय होते. त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली -चिमूरची लोकसभा आणि आरमोरी विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतरही त्यांनी सातत्याने विविध आंदोलनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कांग्रेस क्रियाशील ठेवली होती. या पार्श्वभूमीवर त्यांना दुसरी टर्म मिळेल अशीच अनेकांची धारणा होती. मात्र नव्या अध्यक्षाच्या घोषणेने जिल्ह्यातील बहुजनांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या गेल्याची भावना जोर धरत आहे.
नवा जिल्हाध्यक्ष बहुजन समाजातील असता तर कुणाला फारसे वावगे वाटले नसते. परंतू आदिवासी समाजातील नेत्यालाच पुन्हा जिल्हाध्यक्ष पद दिल्याने कांग्रेस मध्ये मोठा नाराजीचा सूर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खासदार आणि आमदार ही दोन्ही पदे आदिवासींसाठी राखीव असताना संघटनात्मक पदांवरही त्यांचाच भरणा केल्यास पक्षातील बहुजनांचे काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
नवे अध्यक्ष एड. विश्वजीत कोवासे हे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे सुपुत्र असून मागिल काही काळापासूनच कांग्रेस मध्ये सक्रिय आहेत. सध्या त्यांचे कडे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव ही मोठी जबाबदारी आहे. ते शांत, संयमी आहेत. नवे अध्यक्ष म्हणून सर्वप्रथम त्यांचे समोर जिल्ह्यातील नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान आहे. तर आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे दुसरे मोठे आव्हान आहे. ते या आव्हानांचा कसा सामना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


