विशेष वृतान्त

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा – खासदार डॉ. नामदेव किरसान

दिशा समितीची आढावा बैठक संपन्न

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २७ एप्रिल

जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता शासकीय यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते.

बैठकीत खासदार डॉ. किरसान यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान आणि मध्यान्ह भोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर त्यांनी भर दिला. पोषण आहार वाटप करताना अनेकदा धान्य अगोदर खरेदी केल्या जाते आणि बऱ्याच उशिरा त्याचे वाटप केला जाते यामुळे त्या धान्याची गुणवत्ता खराब असल्याचे नमूद करत यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशन व गृहनिर्माण, रोजगार आणि कौशल्य विकास, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार रामदास मसराम यांनी स्थानिक मतदार संघातील अडचणी मांडून त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधी मार्फत मांडण्यात येणाऱ्या तक्रारींची तातडीने दाखल घेण्याच्या सूचना यावेळी खासदार किरसान यांनी दिल्या.
बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!