गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळित, मात्र जीवीत हानी नाही
जिल्ह्यातील ३६ मार्ग वाहतुकीसाठी बंद
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि.३० जुलै
बुधवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र यादरम्यान कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पूरामुळे गडचिरोली–धानोरा, आलापल्ली–भामरागड, कुरखेडा–वैरागड, कोरची–बोटेकसा, धानोरा–रांगी, कोरची–बेतकाठी, कुरखेडा–तळेगाव, रोमपल्ली–झिंगानूर, एटापल्ली–गट्टा आणि मुलचेरा–आलापल्ली या दहा प्रमुख मार्गांसह ३६ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
भामरागड तालुक्यासह इतरही अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने ३६ प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भामरागडमध्ये पूरग्रस्त भागातील ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची आश्रमशाळा व इतर सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भामरागड तालुक्यात पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने रात्रभर बचावकार्य राबवत पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यामध्ये एका कुटुंबातील लहान मुलांसह चार जणांची रात्री सुटका करण्यात आली, तर गुरुवारी सकाळी भामरागड शहरातील आणखी ४५ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन आणि दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. जिल्ह्यातील अहेरी, नागेपल्ली, मुलचेरा आलापल्ली आणि गडचिरोली शहरात सखल भागामध्ये पाणी साचले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. कुरखेडा तालुक्यातील गुरनोलीचा मोठा तलाव फुटल्याने रोवणी झालेल्या शेतातील भात पीकांचे नुकसान झाले.
दरम्यान, वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडून १ लाख ३५ हजार ५९२ क्युसेक, चिचडोह धरणातून ९१ हजार क्युसेक, तर तेलंगणातील मेडिगड्डा प्रकल्पातून ८१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात १६३.८ मिमी, गडचिरोली तालुक्यात १६३.७ मिमी, तर भामरागड मंडळात तब्बल २४१.७ मिमी पावसाची नोंद झाली. सर्व ४२ राजस्व मंडळात अतिवृष्टी झाली आहे. इंद्रावती नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने भामरागडमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान गडचिरोली शहरातील अनेक वॉर्डातील वस्त्या जलमय झाल्या. कन्नमवार वॉर्डातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. चामोर्शी मार्गावरील चांदेकर बिल्डिंगजवळच्या रस्त्यावर पाणी साचल्याने आवागमन करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
हत्तींच्या कळपाने मार्ग बदलला; रोवणीचे मोठे नुकसान
गडचिरोली तालुक्यातील नवरगाव येथील नवगांव ते पोर्ला जाणाऱ्या रस्यावरील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे हत्तीचा कळप नवरगांव जवळील मोडक फार्म हाऊसच्या पहिलेच अडकले.
कालच्या रात्रीच हत्तींचा कळप नवरगांव जंगलात आलेला होता. बुधवारी रात्रीच्या संततधार पावसामुळे नवरगांव जवळील छोटा पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे हत्तींचा कळप अडकला होता. गुरुवारी सकाळी नवरगांव वासीय पुलाकडे पोर्ला मार्ग जात असताना हत्तींचा कळप नवरगांव वासीयांना शेतामधे शेतकर्यांचे रोवणे तुडवितांना दिसले. हत्तींच्या कळपाने पुलावरून न जाता ते नवरगांव येथील रवि भैसारे , राजहंस जांभुळकर , विलास धाकडे आनंदराव भैसारे मनोज राऊत सहीत १० ते १२ शेतकऱ्यांचा शेतातील रोवणे तुडविले त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा–दामनमर्का जंगल परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे सर्व मार्ग बंद असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशासेविका आणि ग्रामस्थांनी तब्बल १८ किलोमीटरची पायपीट करून त्या जखमी युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढत त्याचे प्राण वाचविले. तर मुलचेरा तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या पेडीगुडमच्या नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद अझरुद्दीन यांचा महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांच्या धाडसी बचाव मोहिमेमुळे जीव वाचला. मात्र यादरम्यान त्यांची कार डोळ्यासमोर वाहून गेली.
मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गडचिरोलीतील पूरस्थितीचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२३ मिमी, तर काही भागांत २०० मिमीहून अधिक पाऊस झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. छत्तीसगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात एसडीआरएफचे पथक तैनात असून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन समन्वयाने मदत व बचावकार्य राबवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.



