विशेष वृतान्त

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजपचे अशोक नेते आणि कांग्रेसचे शेतकरी नेते आमने – सामने: अशोक नेते यांनी कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन तर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भूमी अधिग्रहणावरुन मुख्यमंत्र्यांना केले टार्गेट

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ३१ जुलै

गडचिरोलीत शुक्रवारी संपन्न झालेल्या दोन पत्रकार परिषदांमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजपचे अशोक नेते आणि कांग्रेसचे शेतकरी नेते आमनेसामने आले असून माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले तर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भूमी अधिग्रहणावरुन मुख्यमंत्र्यांना टार्गेट करीत जोरदार टोलेबाजी केली आहे.

ऐतिहासिक कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन – डॉ. नेते

माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत नेते यांनी ऐतिहासिक कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना म्हटले की फडणवीस सरकारने त्यांच्या काळात दोन वेळा कर्जमुक्ती केली पहीली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी जी ३८ हजार कोटींची होती तर आता अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेत ५६ हजार कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. याशिवाय महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणले, यातून महाराष्ट्रातील महिला बचत गटांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले.
जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली.
नेते पुढे म्हणाले की, देश जगात आर्थिक दृष्ट्या तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यापूढे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना तलाठी, मंडल अधिकारी किंवा तहसीलदार यांचेकडे जावे लागणार नाही. पूर्वी ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले तरच नुकसानभरपाई देण्याची पद्धत होती. आता ती बदलली आहे. शेतकऱ्यांचे ३३ टक्के जरी नुकसान झाले तरी दीडपट नुकसान भरपाई मिळेल. हे
सर्वेक्षण एआयच्या (गुगलच्या) सहाय्याने कृषी विभागाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आम. मिलिंद नरोटे, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम, मधुकर भांडेकर, अनिल कुनघाडकर, वर्षा शेडमाके, बंडू झाडे, विलास भांडेकर यांचेसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
oplus_2

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची घोर उपेक्षा केली : ब्राह्मणवाडे

राज्य सरकार जनतेशी चर्चा करण्यास तयार नाही. ऐतिहासिक कर्जमुक्ती म्हणून ज्याचा गवगवा भाजप करीत आहे, ती मुळात कर्जमुक्ती नसुन फक्त कर्जमाफी आहे. यासाठी सुद्धा विरोधकांना मोठी आंदोलन करीत सरकारवर दबाव आणावा लागला. यात अजुनही मोठ्या अटी आहे. २ लाखांची मर्यादा आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. खरी कर्जमाफी काँग्रेसच्या काळात स्व. डॉ. मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना केली. मुख्यमंत्र्यांचे
अभिनंदन करणारांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी बळजबरीने अधिग्रहणाच्या मुद्द्यावर कधी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली काय?, हे प्रथम सांगितले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना मागील ८ महिन्यांपासून जिल्ह्यात ढूंकूनही पाहीले नाही. त्यामुळे त्यांचा सर्वात जास्त काळ गैरहजर राहणारा पालकमंत्री म्हणून गौरव करावा लागेल. अशी उपरोधिक टीकाही केली.
पत्रकार परिषदेला जिपचे माजी अध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, उपसरपंच दिवाकर निसार, अनिल कोठारे, प्रभाकर वासेकर, गजानन नैताम, तात्याजी चिचघरे, मिलींद खोब्रागडे यांचेसह अनेक शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!