गोंड जमातीची पारंपारिक संस्कृती व इतिहास यावरील दस्तऐवज गोंडवाना विद्यापीठाच्या संग्रहालयात
मनीषा हिलको यांनी आदिवासी अध्यासन केंद्रात सादर केलेला अंतिम संशोधन अहवाल कुलगुरूंनी स्वीकारला

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.२९ जुलै
आदिवासी जमातीची पारंपारिक संस्कृती व इतिहासाचे अध्ययन आणि दस्तऐवजीकरण संशोधन फेलोशिप योजनेअंतर्गत संशोधनकर्ता मनीषा हिलको यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व धानोरा तालुक्यातील गोंड जमातीची पारंपारिक संस्कृती व इतिहास एक अध्ययन आणि दस्तऐवजीकरण या विषयावरील अंतिम संशोधन अहवाल कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत आदिवासी अध्यासन केंद्रास सादर केला.
आदिवासी समाजाच्या प्रथा, परंपरा, लोकसंस्कृती आणि मौखिक वारशावर वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होत असलेल्या अस्तित्वाच्या धोक्याची दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्रामार्फत
विविध संशोधन उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत आदिवासींचे मौखिक परंपरेतील साहित्य, इतिहास, लोकज्ञान आणि सांस्कृतिक वारशाचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण करून भावी पिढ्यांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी या संशोधनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गोंड समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतन व संवर्धनास महत्त्वपूर्ण योगदान मिळणार असून भविष्यातील संशोधक, विद्यार्थी व अभ्यासकांसाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संशोधनकर्ता मनीषा हिलको यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहास विभागातील सहा. प्रा. डॉ. नरेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गोंड समाजाच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक जीवनावरील महत्त्वपूर्ण संशोधन यशस्वीरित्या पूर्ण केले. यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल कुरखेडा व धानोरा तालुक्यांतील सुमारे ६० गावांना प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन गोंड जमातीची पारंपरिक संस्कृती, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे जीवनसंस्कार, सामाजिक परंपरा, लोकजीवन, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा यांचा सखोल अभ्यास केला. संशोधनादरम्यान प्राथमिक मौखिक साधनांचा प्रभावी वापर करून ज्येष्ठ नागरिक, पारंपरिक धर्मगुरू, गावप्रमुख व स्थानिक जाणकार व्यक्तींकडून माहिती संकलित केली.
संशोधनामध्ये सोनसरी, पलसगड, देवसरा, मुरूमगाव येथील जमीनदारी व्यवस्था, गडी, बाजागड, भवरागड, कुवारदेव व पाटदेव यांच्याशी संबंधित ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीचे दस्तऐवजीकरण करण्यात आले. तसेच सामाजिक जीवनामधील दिवाळ, खिला मुठवा, बस्का पंडूम, धानतेरस, सुरुती, कळूपाणी, गोंड जमातीतील गृह रचना, गोटूल व पाटा, पारंपरिक वाद्ये व लोकगीते, अळका इटीहना, मरमिंग, सगा व्यवस्था, हर दालंगो आणि मंगळीग या परंपरांचा अभ्यास केला.
धार्मिक जीवनाच्या अभ्यासामध्ये संजोरी, देव मंडई, आंगा पेन, कोडता पंडूम, चिकला चीवा, हातोर लोन, इरूक, मरका, बिज्जा पंडूम, चैत्रांग, करसाळ व पाटा, करसाळमधील नृत्य व संगीत, भीमालपेन मरमिंग, माता पोहोचणी, खुट, भुजंग, कुशीर पूजा, वाघबोरोना आणि नवा तिंदाना या धार्मिक विधी, सण-उत्सव व श्रद्धा-परंपरांचे सविस्तर दस्तऐवजीकरण करण्यात आले. याशिवाय गोंड समाजाच्या आर्थिक जीवनातील पारंपरिक शेती पद्धती, वनउपज, कला व हस्तकला, तसेच आहार पद्धती यांचा अभ्यास करण्यात आला. सांस्कृतिक जीवनाच्या अनुषंगाने दिवाळ हाता, लोकनृत्य, मुंडा पाटा आणि पारंपरिक वाद्ये यांचेही सखोल निरीक्षण करून त्यांनी या संशोधनाचे दस्तऐवजीकरण पूर्ण केले.
यावेळी आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम, मार्गदर्शक डॉ. नरेश मडावी तसेच आदिवासी अध्यासन केंद्रातील संशोधक उपस्थित होते.



