गडचिरोलीतील गांधी चौकात झेब्रा क्रॉसिंग आणि आनुषंगिक वाहतूक नियंत्रक पट्टे नसल्यामुळे वाहतूक झाली अनियंत्रित
अपघाताचा मोठा केंद्रबिंदू !

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १७ नोव्हेंबर
गडचिरोली शहरातील मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात मागिल दीड महिन्यांपासून वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल सुरू केलेले आहेत. परंतू ही वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गावर चौकात सिग्नलच्या सोबतीला झेब्रा क्रॉसिंग व आनुषंगिक वाहतूक नियंत्रक पट्टे नसल्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था अनियंत्रित झाली असल्याचे दिसून येते. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे हा चौक अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे.
गांधी चौक हे गडचिरोली शहराचे प्रवेशद्वार आहे. नागपूर, चंद्रपूर, धानोरा आणि चामोर्शी या चारही मार्गाने ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांना गांधी चौकातूनच ये-जा करावी लागते. या चौकातून दररोज सुमारे पाच ते सहा हजार वाहनांची ये-जा सुरू असते. पूर्वी चौकात सिग्नल नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण वाहतूक पोलीस मॅन्युअली करीत होते. या परिस्थितीत आवागमन करणाऱ्या कोणत्याही वाहनांना थांबावे लागत नव्हते. परंतू सिग्नल्समुळे व्यवस्थेत बदल होऊन प्रत्येकाला थांबावे लागते. या दरम्यान झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे वाहनांनी नेमके कुठे थांबायचे हे कळत नाही. दुसरीकडे आपल्या सरळ बाजूने म्हणजे डाव्या बाजूला जाण्यासाठी जागाच शिल्लक रहात नाही. नेहमीच घाईत असलेले लोक मिळेल तिथून मार्ग काढत आपला रस्ता चोखारताना इतरांची जराही पर्वा करीत नाहीत. आणि रस्ता नियंत्रणाच्या उपाययोजना परिपूर्ण नसल्यामुळे वाहतूक पोलीस सुद्धा कारवाई करण्यात हतबल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर झेब्रा क्रॉसिंग आणि आनुषंगिक वाहतूक नियंत्रक पट्टे हे अनिवार्य आहेत. परंतू राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्यामुळे शहराला अनियंत्रित वाहतूकीला सामोरे जावे लागत आहे. पोलीस विभागाने राष्ट्रीय महामार्ग विभागाला सिग्नल सुरू करण्यापूर्वीच झेब्रा क्रॉसिंग आणि आनुषंगिक वाहतूक नियंत्रक पट्टे लावण्यासाठी पत्र दिल्याचे समजते.राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक दिड महिन्यात लावण्याचे कबूलही केले होते. त्यालाही बराच काळ लोटला, परंतु अजूनही हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील अनियंत्रित वाहतूक व्यवस्था कधी सुरळीत होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
एक दिवसाचे काम, परंतु ” सरकारी काम न, सहा महिने थांब” अशी स्थिती
गांधी चौकातील झेब्रा क्रॉसिंग आणि आनुषंगिक वाहतूक नियंत्रक पट्टे लावण्याचे काम हे अधिकतम एक दिवसाचे आहे. दुसरा मुद्दा असा की सिग्नल सुरू करण्यापूर्वीच झेब्रा क्रॉसिंग व आनुषंगिक पट्टे लावण्याचे काम पूर्ण व्हायला हवे होते. परंतू राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची ” सरकारी काम न, सहा महिने थांब” अशी प्रवृत्ती असल्यामुळे गांधी चौकातील वाहतूक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे चौकात अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
रामदास जराते, चिटणीस शेकाप, गडचिरोली
चिंता करू नये, आम्ही आमच्या सोयीनुसार काम करु
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप कार्यकारी अभियंता राजेंद्र लिंगावार यांना विचारले असता त्यांनी, सिग्नल लागून जवळपास केवळ महिणाच झाला आहे. आम्ही झेब्रा क्रॉसिंग लावण्यासंदर्भात संबंधिताला आदेश दिले आहेत. तो त्याच्या सोयीनुसार एकदिड महिण्यात काम करेल आपण चिंता करु नये. अशा उर्मट आणि बेदरकार भाषेत उत्तर दिले.