विनयभंग करणाऱ्या आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावास व ४ हजाराची द्रव्यदंडाची शिक्षा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ ऑगस्ट
घरी एकटीच असल्याची संधी साधून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील न्यायदंडाधिकारी एम.आर.वाशीमकर यांनी दोन वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. वामन ब्रम्हानंद कोकीळ (३५) रा. नवरगाव असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने १० नोव्हेंबर २०२१ रोजी पिडीत महिलेला काहीही न विचारता तिच्या घरात प्रवेश केला व तिला वाईट शब्दात बोलून विनयभंग केला. पिडीत महिलेने गडचिरोली पोलीस स्टेशन गाठले व आरोपीविरोधात तोंडी तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार भुवनेश्वर गुरनुले यांनी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पुरावे व साक्षीदारांच्या बयानावरून मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर.वाशीमकर यांनी आरोपीस कलम ३५४ मध्ये २ वर्ष सश्रम कारावास व ३५०० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ३४१ नुसार १५ दिवस साधा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकारी पक्षातर्फे सहा सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम व कोर्ट मोहरर पोलीस शिपाई हेमराज बोधनकर यांनी काम पहिले.