नवरगाव गट ग्रामपंचायत मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामफलक काढण्याचा वाद जिल्हाधिकाऱ्यांमुळे चिघळला !
जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या हेकेखोरीमुळे त्यावर शुक्रवारी तोडगा निघाला नाही.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२२ डिसेंबर
जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील नवरगाव गट ग्रामपंचायत मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामफलक काढण्याचा वाद चिघळला असून जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या हेकेखोरीमुळे त्यावर शुक्रवारी तोडगा निघाला नाही. ग्रामपंचायतमधील फलक लावणारे आणि काढणारे अशा दोन्ही गटांची जिल्हा प्रशासना सोबत चर्चा झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना फटकारत फलक लावण्यासाठीचा ठराव घेतलेली ग्रामसभाच अवैध असल्याचे सांगून आगामी १५ दिवसांत नव्याने ग्रामसभा घेऊन त्यात होणाऱ्या निर्णयावर अंमलबजावणी करा असा असे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्देशावर आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हाधिकारी संजय मीना हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामफलकाचा वाद सोडविण्यात असफल झाले आहेत.
बुधवारी नवरगाव ग्रामपंचायतने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या नामफलक पोलीसी बळाचा वापर करून अतिक्रमणाच्या नावावर काढून टाकला. त्यानंतर नवरगाव येथील बौद्ध समाजबांधवांनी गाव सोडण्याचा निर्णय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला मोर्चा वळवला. शुक्रवारी हा मोर्चा दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला असता आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून पोलीसांनी रोखल्यामुळे नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडला. आणि सायंकाळपर्यंत तेथेच बसुन राहिले आहेत.
या संदर्भात नवरगावचे सरपंच आणि इतर सदस्यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील नवरगाव गट ग्रामपंचायत मध्ये २१ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत वेळेवर आलेल्या विषयामध्ये स्थानिक बस स्टॉप परिसराला संविधान चौक असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली. परंतु वेळेवरच ते नाव बदलून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देऊन तसा नामफलक लावण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेला सरपंच काही कारणामुळे अनुपस्थित होते. त्यामुळे ही सभा उपसरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आणि त्याच दिवशी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा नामफलक लावण्यात आला. त्याला विरोध करुन ग्रापंने तक्रार केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाने १ डिसेंबर २०२२ ला तो काढून टाकला. ६ जानेवारी २०२३ रोजी पुन्हा काही लोकांनी तो फलक लावण्याचा प्रयत्न केला असता ४२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याच दरम्यान ८ जानेवारीला गावातील इतर समाजातील लोकांनी वीर बाबुराव शेडमाके,ताजुद्दीन बाबा, संताजी जगनाडे महाराज, आणि अहिल्याबाई होळकर चौक असे नाव देण्याची मागणी केली. परिणामी ग्रापंने २१ नोव्हेंबर २२ च्या ठरावाची समीक्षा करण्याचे ठरविले असता फलक लावणारा बौद्ध समाज हा न्यायालयात गेला. आणि त्यांनी जैसे थे अशी स्थगिती मिळवली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ३० आक्टोंबर ला रात्री अज्ञात व्यक्तींनी बस स्टॉप परिसरात ग्रापंच्या जागेत पुन्हा फलक लावला. यावरून ग्रापंच्या सरपंच आणि इतर सदस्यांनी आक्षेप घेत प्रशासनाकडे तक्रार केली. ८ नोव्हेंबर च्या ग्रापंच्या सभेत अतिक्रमण काढण्याचा ठराव घेऊन २१ डिसेंबर रोजी सदर फलक जवळजवळ २०० पोलिसांच्या बळारव काढण्यात आला. यामुळे संतप्त बौद्ध समाजबांधवांनी गाव सोडण्याचा निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैलबंडीवर सामान लादून मोर्चा काढला. हा मोर्चा शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मात्र मोर्चेकऱ्यांना बैलबंडीसह जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून पोलीसांनी रोखल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर थोडे दुर बैलबंडीसह मोर्चेकऱ्यांना येऊ दिले आणि महामार्गावरील वाहतूक मोकळी केली.
दरम्यान झालेल्या चर्चेतून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करणाऱ्यांना ठरविले जातीयवादी
शुक्रवारी इंडिया आघाडीचे शहरात निदर्शन होते. आघाडीचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असताना जिल्हाधिकारी संजय मीना यांनी फलक काढण्याविरुद्ध करण्यात येत असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा केली. यावेळी मीना यांनी वेगवेगळे प्रस्ताव दिले. ते न स्वीकारल्याने मीना यांनी चिडून या नेत्यांना जातीयवादी ठरवले.