नक्षल समर्थकांना ८ ऑगस्ट पर्यंत पीसीआर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ जुलै
नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे एका एमबीबीएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना नक्षली बॅनर लावताना पोलिसांनी अटक केली होती. तीनही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ ऑगस्ट पर्यंत पीसीआर सुनावला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन उईके सह प्रफुल बट व अनिल बट यांचा समावेश आहे. सप्ताहाचे दोन दिवस शांततेत गेले असून नक्षल कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
नक्षल सप्ताहा दरम्यान नक्षलप्रभावित क्षेत्रात बंदचे आवाहन, शहीद स्मारक उभारून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे, नक्षल्यांच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी घातपात घडवून आणणे, पोलीस आणि सरकारांचा निषेध करणारे बॅनर लावणे अशी नक्षल्यांची कार्य प्रणाली असते. अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमलापूर-दामरं या मार्गावर नक्षली समर्थक बॅनर लावत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना अटक केली. आरोपींविरूध्द कलम १२० (ब), ३४ यासह बेकायदेशीर प्रतिबंध अधिनियम १९६७ कलम १०, १३, २०, मपोका कलम १३५ अन्वये गुन्हा करण्यात आला व शुक्रवारी तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्ट पर्यंत पीसीआर सुनावण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.
नक्षल सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून गस्त वाढविण्यात आली असून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.