आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील १९ फर्निचर मार्ट वर वनविभागाचे एकाच वेळी छापे
७८५९०५ रु किंमतीचा माल जप्त, आसरअल्ली क्षेत्रसहाय्यक निलंबित

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २५ जून
गुप्त माहितीच्या आधारे आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा, कंबलपेठा या गावात असलेल्या १९ फर्नीचर मार्टवरती सिरोंचा वनविभागातील वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करुन एकाच वेळी करण्यात आलेल्या छापेमारीत सदर फर्नीचर मार्टमध्ये मोठया प्रमाणात अवैध रित्या साग पाट्या व इतर सागाचे फर्नीचर साठी बनवण्यात येणारे सुटे भाग फर्नीचर मार्ट धारकांकडे आढळून आले. वनविभागाने साहित्य जप्त करून सर्व फर्निचर मार्टचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले.
यामध्ये जय श्रीराम फर्निचर मार्ट, आसरअल्ली प्रोप्रा रविंद्र मिनाबाबू कासोजी , महालक्ष्मी फर्नीचर मार्ट आसरअल्ली प्रोप्रा. संतोष साबंय्या गोत्तुरी, लक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली प्रोप्रा. समय्या पोचालू गंप्पा, त्रिमुर्ती फर्नीचर मार्ट, जंगलपल्ली प्रोप्रा. देवेद्र लच्चन्ना गोत्तुर, बालाजी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली प्रोप्रा. किशोर शंकर कोरंटला, ओम श्री विराट फर्नीचर मार्ट जंगलपल्ली प्रोप्रा.राजेंद्र अंकन्ना गोत्तुरी , गंगापुत्रा फर्नीचर मार्ट, आसरअल्ली प्रोप्रा. राजकुमार समय्या पोटे, भार्गवचारी फर्नीचर मार्ट, अंकिसा प्रोप्रा. सुरेश चंद्रय्या अरिंदा यांचेकडून ७८५९०५ रु किंमतीचा माल जप्त करुन आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करुन सर्व फर्नीचर मार्ट धारकांविरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला. वरिल सर्व फर्नीचर मार्ट धारकांचे परवाने २३ जून पासुन कायमस्वरुपी रद्द करण्यात आले.
सदर कारवाई करीत असतांना झालेल्या प्राथमिक चौकशी मध्ये क्षेत्रसहाय्यक आसरअल्ली यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याबाबत आढळून आल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी दरम्यान दिसून आले की, अवैध माल हा आसरअल्ली लगतच्या वनविकास महामंडळाच्या साग रोपवनातील तसेच प्रादेशिक जंगलातील आहे. या जागांची तपासणी सुरु आहे. अवैध साग तोड मधील गुन्हेगार सराईत असुन वनविभागातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, स्थानिक गावातील लोक माहिती देण्यास असहकार्य करणे या सारख्या बाबींमुळे वनविभागास अडचणी येत आहे. तरीही सदर गुन्हेगारांवर कडक कारवाई करुन त्यांच्यावर आळा बसविण्याचा पुरेपुर प्रयत्न सिरोंचा वनविभाग करीत आहे. नजीकच्या काळातील ही मोठी कारवाई असुन यामुळे अवैध सागतोडीवर आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फर्नीचर मार्ट यांना अवैध साग लाकूड पुरवठा करणारे गुन्हेगार हे अंकिसा, आसरअल्ली, कोपेला या गावातील लोक असुन त्यांची माहिती घेण्याची कारवाई जोमाने सुरु आहे. सदर कारवाई मध्ये पी.डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी सिरोंचा, पी. बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बामणी व त्यांची चमु, एस.पी. बारसागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी झिंगानुर व त्यांची चमु, एन. टी. चौके, वनपरिक्षेत्र अधिकारी, पी.एम.पाझारे, वपअ फिरते पथक तसेच देचली परिक्षेत्रातील वनकर्मचारी असे एकुण ५० अधिकारी, कर्मचारी मिळून कारवाई केली. वरिल प्रकरणाची सखोल चौकशी पी. डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी, सिरोंचा यांचे मार्गदर्शनात पी.बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बामणी हे करित आहेत. सिरोंचा वनविभागाकडून गेल्या १५ वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते.