जहाल महिला नक्षली मुडे हिडमा मडावीला अटक
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०५ ऑगस्ट
कसनसूर दलमची सदस्य असलेल्या जहाल महिला नक्षली मुडे हिडमा मडावी हिला एटापल्ली पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली आहे.
२८ ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून सरकारविरोधी कार्यक्रम राबवून हिंसक कारवाया घडवून आणतात. या कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून जिल्ह्याच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान ३ ऑगस्ट रोजी एटापल्ली पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी केली असता, एक महिला संशयीतरीत्या मिळून आली. त्यामुळे जवानांनी तिची महिला पोलिसांच्या मार्फत अधिक चौकशी केली असता तिच्याकडे असलेल्या साहित्यावरून ती कसनसूर दलमची सदस्य जहाल नक्षली मुडे हिडमा मडावी असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अटक केली. ही छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून तिच्या नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक समय मुंडे, समीर शेख, अखेरीचे अनुज तारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.