विशेष वृतान्त

तोडगट्टा ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुरजागड पट्टी इलाक्यातील भुमीया पेरमा गायता यांना माओवाद्यांकडून चेतावणीचे पत्र

गोंडी भाषेत लिहिले पत्र

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २७ मार्च 

एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे ११मार्च पासून  खदान, रस्ता, पूल, पोलीस कैम्प, टॉवर या विरोधात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सुरजागड इलाक्यातील ७० ग्रामसभांमधील अनेक ठिकाणची जनता पाहिजे त्या प्रमाणात सहभागी होताना दिसत नसल्यामुळे संतप्त नक्षलवाद्यांच्या भा. क. पा. (माओवादी) च्या भामरागड एरिया कमेटीने शनिवारी रात्री उशिरा सुरजागड इलाक्यातील ७० ग्रामसभांच्या गायता, पेरमा, भूमिया यांना चेतावणी देणारे पत्र पाठवले असल्याची अपुष्ट माहिती आहे. या गोंडी भाषेत लिहिलेल्या पत्रातील मजकूर मराठी मध्ये शक्य तेवढे सोपे भाषांतर करुन आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

सदर पत्रामध्ये असे म्हटले आहे की, प्रिय साथी, गायता, पेरमा, भूमीया,  तुम्हाला लिहीण्याचा विषय हाच आहे की यापूर्वी सुध्दा समज देत आमच्या पार्टीच्या वतीने चिट्टी लिहण्यात आली होती. त्यामध्ये  लूटारु सरकार आदिवासींच्या खनिज संपतीची लूट करण्यासाठी, आपल्याला व आपल्या ग्रामसभेला जल- जंगल-जमीनीवर असलेले हक्क संपुष्टात आणून, आपल्या आदिवासींचे आपल्या उत्पीड़न करुन जनतेचे जीवन बरबाद करण्याची योजना आखली आहे. दमकोंडावाही पहाडीत खदान सुरु करून जनतेच्या खनिज संपतीची सध्या सुरु असलेल्या सूरजागड पहाड़ी सारखी लूट करून घेऊन जाण्याच्या उद्देशाने सरकार आज रस्ता, पूल, पोलीस कैम्प, टॉवर आणि खदान यासारखे अनेक प्रकारचे निर्माण कार्य करत आहे. याचे जनतेला उपयोगापेक्षा नुकसानच अधिक होणार आहे. अशा योजनांवर सरकार आणि प्रशासन सध्या अंमल करीत आहे. त्यासाठी तुम्ही अशा जनविरोधी कामांच्या विरोधात समोर राहून लोकांना जन आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करीत जन आंदोलन चालविण्याचीही तुमची जबाबदारी आहे. अश्या आशायाचे पत्र यापूर्वी लिहलेले होते.

परंतू तुम्ही सदर पत्राची कुठेच गिनती न करता, सध्या तोड़गट्टा येथे सुरु असलेल्या खदान, रस्ता, टॉवर विरोधी जनआंदोलनामध्ये सहभागी होताना दिसत नाही. याचा अर्थ तुम्हाला येथील जल-जंगल-जमीन नको आहे. दुश्मनांच्या योजनामधून मिळालेला पैसा तुमचे पालन-पोषण करतो. म्हणूनच दुश्मन पक्षामध्ये राहून काम करता. असेही म्हटले आहे.

त्यामुळे आमच्या पार्टीच्या वतीने शेवटची चेतावनी  देण्यात येत आहे की, तुम्हाला लोकांसोबत राहून जीवन जगायचे असेल तर जन आंदोलनात सहभागी व्हा. दुश्मन पक्षामध्ये राहायचे विचार असल्यास घर, दार, जागा, भूमी, जीव, नातेवाईक सोडून दुश्मन पक्षासोबत पळून जावे लागेल तसेच तुम्ही जनविरोधी सारखे तयार होऊन जनतेसोबत आणि आमच्या पार्टीसोबत खेळ खेळल्यास तुमच्यावर जन अदालतीमध्ये कडक कार्यवाही करावी लागेल. असे पत्र भा. क. पा. (माओवादी) च्या भामरागड एरिया कमेटीने शनिवारी रात्री उशिरा हे पत्र सुरजागड इलाक्यातील ७० ग्रामसभांच्या गायता, पेरमा, भूमिया यांना पाठवले असल्याची अपुष्ट माहिती आहे. हे पत्र मिळाल्यामुळे पारंपरिक ग्रामसभांच्या भुमीया गायता आणि पेरमांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यासोबतच खदान विरोधी आणि जल जंगल जमीनीच्या आंदोलनात माओवाद्यांचा शिरकाव झाला की काय अशी चर्चा सुरू झाली असून, त्यामुळे या एकुणच आंदोलनावरही प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!