गडचिरोलीत कांग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत
प्रचारात कांग्रेसला जोरदार समर्थन; तर तिसऱ्या क्रमांकासाठी ४ उमेदवार लढतीत
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ११ नोव्हेंबर
गडचिरोली विधानसभेकरीता कांग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी तिसऱ्या क्रमांकासाठी सुध्दा लढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
मागील दोन दिवसांपासून प्रचाराला रंग चढला आहे. उमेदवार सर्वशक्तिनिशी प्रचार करुन आपणास का मत द्यावे हे सांगण्याचा प्रयत्न सभा, सम्मेलन, वाहनांवरील प्रचार भोंगे, कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी, सामाजिक क्षेत्रातील पुढारी यांना प्रत्यक्ष भेटून, इतर विरोधी पक्षातील नाराजांची मनं वळवण्याचा प्रयत्न करतानाच आपल्याही पक्षांतील नाराजांची समजूत काढली जात आहे.
गडचिरोली विधानसभेत कांग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी विरुद्ध भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांच्यात मुख्य लढत दिसून येत आहे. दोघांचाही प्रचार जोरात सुरू आहे. परंतू गडचिरोली विधानसभेत भाजपच्या तुलनेत कांग्रेसला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. कांग्रेस उमेदवार मनोहर पाटील पोरेटी हे धानोरा तालुक्यातील रहिवासी असून ते मागिल २० वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय आहेत. मितभाषी, शांत, सामान्य लोकांशी नाळ जुळलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. तर डॉ मिलिंद नरोटे हे राजकारणात नवखे, रा. स्व. संघाशी जुळलेले जनतेशी नव्याने संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत असलेले आहेत. पोरेटींना पक्षांतर्गत विरोधक नाहीत. तरी नव्यानेच कांग्रेस मध्ये दाखल झालेल्या डॉ सोनल कोवे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. दुसरीकडे भाजपने निवर्तमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांची माघार यशस्वी केली असली तरी तरी निवडणुकीपासून त्यांना दुर ठेवून अविश्वास दाखवला त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. याचा जोरदार फटका डॉ.नरोटे यांना बसणार असल्याचे चित्र आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी चार उमेदवार लढतीत
गडचिरोली विधानसभेत कांग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत असली तरी उर्वरित चार उमेदवार तिसऱ्या क्रमांकासाठी लढत देत आहेत यात शेकापच्या जयश्री वेळदा, वंचित बहूजन चे भरत येरमे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे योगेश कुमरे आणि अपक्ष सोनल कोवे यांचा समावेश आहे. यातील योगेश बाजीराव कुमरे यांनी त्यांचे दिवंगत वडील बाजीराव कुमरे यांच्या पुण्याईने आणि आपल्या विकासाच्या नव्या दृष्टीने २५ ते ३० हजार मतांचा आकडा पार करु असा दावा केला आहे. मात्र वर्तमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता प्रमुख दोन उमेदवार वगळता अन्य सहाही उमेदवारांच्या एकुण मतांतांची गोळाबेरीज ही ३० हजारांपर्यंत जरी गेली तरी त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण झाली असे मानले जात आहे.
दरम्यान १८ तारखेला सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा बंद होणार असून मुक आणि व्यक्तीगत प्रचार सुरू होईल. २० ला मताधिकाराचा हक्क बजावतील आणि २३ ला ईव्हीएम उघडून पूर्णसत्य समोर येईल. तोपर्यंत वेट अँड वॉच.