सुरजागडच्या अनियंत्रित वाहतुकीचा बळी; ट्रकच्या खाली चिरडून 12 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.14 मे
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 14 मे रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
सोनाक्षी मसराम वय 12 वर्ष रा. नांदगाव फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर असे मृतक मुलीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक मुलगी आपल्या मामासोबत दुचाकी क्रमांक MH 34 AZ 9575 ने आष्टीवरून गोंडपिपरी कडे जाताना वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर दुचाकी घसरली यात दुचाकीवरून मृतक मुलगी आणि तिचा मामा खाली पडले एवढ्यात मागून बल्लारशाकडे लोहखनिज घेउन जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली मृतक मुलगी चिरडल्या गेली यात तिचा जागीच मृत्यु झाला. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. घटनेची माहिती होताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शववि्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल केले.