आपला जिल्हाराजकीय

मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टर घ्या, पण गाव खेड्यात या

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे लक्षवेधी आंदोलन ; विविध कार्यालयात जाऊन प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन व हेलीकॉप्टर च्या प्रतिकृती चे वितरण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ जून 

गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य माणसाचे कोणीही ऐकून घेत नाहीत. येथील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत.देवेंद्र फडणवीस साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक आहात आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण हेलिकॉप्टर शिवाय गडचिरोलीत येऊ शकत नाही. त्यामुळे “मुख्यमंत्री साहेब आपण स्वतंत्र हेलिकॉप्टर घ्या, पण नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी गाव खेड्यात या” अशा घोषणा देत गडचिरोली जिल्हा काँग्रेसने गुरुवारी गडचिरोलीच्या गांधी चौकात आगळेवेगळे लक्षवेधी आंदोलन केले. त्यानंतर विविध प्रशासकीय कार्यालयात जाऊन कांग्रेस तर्फे निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक हेलिकॉप्टरची प्रतिकृती भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी मागील तीन वर्षापासून स्वतःकडे घेतली असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होण्याऐवजी अधिक वाढत चालल्या आहेत.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही,  रानटी हत्तींचा उपद्रव कायम आहे. सुरजागड खाणीतील अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात, रस्त्यांची झालेली  दुरवस्था आणि त्यामुळे मान्सून पूर्व  जिल्ह्यातील रस्ते बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. बसेसची दयनीय अवस्था झाली आहे. शेतकरी आणि नागरिकांना छोट्या मोठ्या समस्यांना घेऊन प्रशासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या कंत्राटदारांचे देयके थकीत आहेत. मनरेगाचे पैसे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पाकरिता शेतकऱ्यांशी कुठल्या प्रकारची चर्चा न करता सरसकट जमिनी अधिग्रहीत  करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. अशा अनेक समस्या जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावत आहेत.

त्यामुळे जिल्ह्याचे  पालकमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रत्यक्ष येऊन जनतेची दुःखं समजून घ्यावे. ही अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने गडचिरोलीत येणे, आणि लगेचच नागपूरला परत जाणे, हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची दिसत आहे, इतकेच नाही तर जिल्ह्यातील प्रमुख पदावर बसलेल्या प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांची देखील हिच परिस्थिती आहे.

त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासह प्रमुख पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य  नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गाव किंवा किमान तालुकास्तरावर तरी यावे या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात  मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टर घ्या पण गाव खेड्यात या, या घोषणेसह आगळे वेगळे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले व विविध कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना  हेलिकॉप्टरची प्रतिकृती आणि निवेदन देण्यात आले.

यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, राजेश ठाकूर, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, भूपेश कोलते, रुपेश टिकले, वामन सावसागडे, शंकर सालोटकर, प्रभाकर वासेकर, विनोद लेनगुरे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, घनश्याम वाढई, रमेश चौधरी,अनिल कोठारे, जितेंद्र मुनघाटे, काशिनाथ भडके, राकेश रत्नावार, देवेंद्र ब्राह्मणवाडे यांचे सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी महिला युवक यावेळी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!