विशेष वृतान्त

३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, 11 जुलै:

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरु असून सोमवारी सुद्धा पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नदीच्या काठी व सखल भागात वास्तव्यास असलेल्या ३५३ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.

जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील सूर्यापल्ली येथील १६, गोलाकर्जी ४०, तिमरम ४, मोदुमगहगू ४, निमलगुडम १२, रेगुनवाही १५, मरमपल्ली ४०, लिंगमपल्ली १२०, कमलापूर ३१, छल्लेवाडा ७१ जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तसेच सिरोंचा तालुक्यातील महीकुंठा ३२ व सूर्यावपल्ली येथील ४० नागरिक असे एकूण ३५३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तर पुरामुळे मागील तीन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे काही गावांचा संपर्क तुटला असून सिरोंचा तालुक्यात दूरसंचार सुविधाही बंद पडली आहे. तीन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गडचिरोली शहरातील लांझेडा येथील जीर्णा अवस्थेत असलेले एक घर कोसळले असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हवामान खात्याने १३ जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला असून उपाययोजना म्हणून बुधवारपर्यंत अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये वगळता शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत. पूरग्रस्तांना प्राथमिक मदत करण्याकरिता जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यात जिल्हा काँग्रेस कमिटी व भाजपने हेल्पलाईन सुरू केले आहे.

वैनगंगा नदी, वर्धा नदी, प्राणहिता नदी व गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ७५ गेट उघडलेले असुन पुन्हा ६ गेट उघडणार असल्याने विसर्ग १० लक्ष क्युसेक्स पेक्षा अधिक वाढणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!