कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला आयकर गहाळ ; वरोरा पंचायत समितीमधील प्रकार
अखिल वरोरा शिक्षक संघ पोलिसात तक्रार दाखल करणार ?

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि २२ जुलै
वरोरा पंचायत समिती कार्यालयाने लेखा वर्ष २०२२-२३ मधील दरमहा आयकर कपात करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयकर त्यांच्या पॅनवर अजूनही जमा केलेला नाही. त्यामुळे नक्कीच पं. स. वरोरा ने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला आयकर गहाळ किंवा अपहार केलेला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याने अखिल वरोरा शिक्षक संघाने वरोरा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून याविरोधात पोलिसात तक्रार नोंदविण्याची परवानगी मागितली आहे.
वरोरा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची संख्या व त्यांच्या पगारातून दरमहा आयकरासाठी कपात केली जाणारी रक्कम ही प्रत्येकी वर्ष २० ते ३० हजार रुपये असते. मात्र, आयकरासाठी कपात केली जाणारी रक्कम त्यांच्या पॅनवर जमा न करता परस्पर गहाळ केल्याचे कर्मचाऱ्यांनी काढलेल्या ” २६ – ए. एस. ” वरुन दिसत आहे. मागील वर्षीही कार्यालयाकडून असाच प्रकार घडला होता. याबाबत विचारणा केली असता समर्पक उत्तर मिळाले नाही. मागील वर्षीच्या पगारातून दरमहा कपात केलेला आयकर संबंधितांच्या पॅन नंबरवर जमा केलेला नाही. संबंधितांना रिटर्न फाईल करतेवेळी पगारातून नियमित कपात केली असतांनाही आगावू रक्कम ऑनलाईन भरावी लागत होती. या भ्रष्टाचाराविरोधात अखिल वरोरा शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेतली असून पोलिसात तक्रार देण्याची परवानगी संवर्ग विकास अधिकारी यांना मागितली आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेली ही रक्कम आयकर विभागाला का पोहचली नाही ? किंवा कुठे गहाळ झाली ? हा आता तपासाचा विषय बनला आहे.