झाडीपट्टीतील लावणी सम्राज्ञीच्या आत्महत्येने खळबळ
आत्महत्येचे कारण अस्पष्ट , रसिकांना मोठा धक्का , रंगभूमीवर शोककळा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१६ फेब्रु.
‘बाई मी लाडाची गं लाडाची.. कैरी पाडाची…’ या गाजलेल्या लावणीवर ठसकेबाज अदाकारी करुन रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी नाट्यकलावंत दिशा ठवरे (३२, रा.हेटी, देसाईगंज जि.गडचिरोली ) हिने १६ फेब्रुवारी रोजी भंडारा येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे रसिकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने झाडीपट्टी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
मूळची भंडारा येथील गांधी वॉर्डमधील दिशा ठवरे मागील दहा वर्षांपासून नाट्य क्षेत्रात कार्यरत होती. झाडीपट्टी रंगभूमीत लावणी कलावंत म्हणून परिचित असलेली दिशा पती, एक मुलगा व एका मुलीसह देसाईगंजच्या हेटी येथे राहात होती.
बाई मी लाडाची गं लाडाची..’ या लावणीवरील तिचे ठुमकेदार नृत्य प्रसिध्द होते. रसिकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या दिशाने गडचिरोलीसह भंडारा, साकोली व अर्जुनी या परिसरात झाडीपट्टी रंगभूमीवर अदाकारी करुन रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. दोन दिवसांपूर्वी ती पती व मुलांसह भंडारा येथे मूळ गावी गेली होती. तेथे तिने घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी देसाईगंज व परिसरात वाऱ्यासारखी पसरली. झाडीपट्टी कलावंतांसह रसिकांनाही या बातमीने धक्का पोहोचला. तिने हे पाऊल का उचलले, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांना घटनास्थळी सुसाईट नोट आढळली नाही, त्यामुळे गूढ वाढले आहे.