शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीसाठी सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटलांचे ऊद्या गडचिरोलीत आगमन
दोन दिवस मुक्कामी राहून घेणार गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.२४ नोव्हेंबर
भरतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह ऊद्या शुक्रवारी (ता.२५) गडचिरोलीत दाखल होत आहेत. शेकापच्या केंद्रीय समितीच्या बैठकीचे निमित्ताने ते सुरजागड सह जिल्ह्यातील विविध समस्यांवर प्रकाश टाकणार असल्याचे समजते.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक २६ व २७ नोव्हेंबरला गडचिरोली येथील बँक ऑफ इंडियासमोरील हॉटेल लेक व्ह्यू येथे होणार आहे. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील, आ. शामसुंदर शिंदे, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील, पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशा शिंदे, पुरोगामी युवक संघटने राज्याध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख, माजी आमदार संपतबापू पवार, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, प्रा एस.व्ही.जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे उपस्थित राहणार आहेत. शिवाय राज्यभरातील दीडशेहून अधिक प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
आ.जयंत पाटील हे शुक्रवारी गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर विविध ठिकाणी भेटी देणार असून, शेतकरी, मजूर, कामगार आणि विविध समुहांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. यात प्रामुख्याने सुरजागडचे उत्खनन, लोह खनिजाच्या धुळीमुळे होणारे दुष्परिणाम, अवजड वाहतूकीमुळे फुटलेले रस्ते, आदीवासींचे प्रश्न, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे नीट पंचनामे न होणे, पिक विम्यापासुन वंचित शेतकऱ्यांच्या समस्या, यांसह मच्छीमार, फुटपाथ धारक, विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आगामी हिवाळी अधिवेशनात चर्चा घडवून आणनार आहेत.या शिवाय ते जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती शेकापच्या राज्य मध्यवर्ती समितीचे सदस्य तथा जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिली आहे. शेकापच्या केंद्रीय समितीच्या बैठकीचे निमित्ताने वरिल सर्व मुद्दे चर्चेला येणार आहेत. भाई जयंत पाटील ऊद्या आगमनानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना या सर्व प्रश्नांवर शेकापची भूमिका मांडतील अशी शक्यता आहे.
विशेष उल्लेखनीय असे की आ. भाई जयंत पाटील यांनी विधीमंडळात सुरजागड खाणीचा प्रश्न आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व इतर अनेक प्रश्न उपस्थित करुन चर्चा घडवून आणली आहे.