पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ जुलै
जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत एका गावातील विवाहित युवकाने शेजारीच राहत असलेल्या नात्यातील दोन वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. हा युवक त्या गावात कोतवाल म्हणून काम पाहतो. या घटनेनंतर तो फरार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर ३० वर्षीय आरोपीची पत्नी गरोदर असून ती माहेरी गेली आहे. अशातच शनिवारी दुपारच्या सुमारास तो पिडीत मुलीच्या घरी गेला. मुलीचे आईवडील घरीच होते. मुलीला फिरवून आणतो, खाऊ घेऊन देतो या बहाण्याने तिला दुचाकीवर घेऊन गेला, नातेवाईकच असल्याने त्याच्यावर आई-वडिलांनी विश्वास ठेवला. काही वेळानंतर सदर युवकाने तिला तिच्या घरी आणून सोडले. पण मुलीची अवस्था बघून आईवडिलांना शंका आली. त्यांनी एटापल्ली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. व पिडीत मुलीला एटापल्ली सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला गडचिरोली व त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले.
आरोपीविरोधात एटापल्ली पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत तसेच कलम ३७६ (४,६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन दिवस लोटूनही आरोपी पोलिसांना गवसलेला नाही. घटनेचा तपास उप विभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस करीत आहेत. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.