नक्षलवाद्यांनी केली टिटोडा येथील गाव पाटलाची हत्या.
१०-१२ लोकांचे अपहरण ही केवळ अफवा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २४ नोव्हेंबर
गुरुवारी २३ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता नक्षलवाद्यांनी टिटोडा येथील गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप सदर पाटलावर केला आहे. घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तेथे टाकलेल्या पत्रकात हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलीस तसेच स्थानिक नेत्यांवर आरोप केले आहेत. लालसू वेळधा (५५, रा. टिटोडा ता. एटापल्ली) असे हत्या झालेल्या गाव पाटलाचे नाव आहे.
हेडरी पोलीस ठाणे हद्दीतील जांबिया ग्रामपंचायत अंतर्गत टिटोडा गावात नक्षलवाद्यांनी हे भीषण हत्याकांड घडवून आणले. पाटील लालसू वेलदा हे स्वत:च्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले. लालसू यांच्या कुटुंबासमोरच गोळ्या झाडून हत्या केली. दरम्यान, या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जि.प. सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे. हत्येनंतर घटनास्थळी पत्रक आढळले. त्यात सुरजागड लोह खाणीचे समर्थन व पोलिसांसाठी काम करत असल्याने गाव पाटलाची हत्या केल्याचा दावा नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजनल कमेटीने केला आहे. यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. लालसू यांचा मुलगा पोलीस दलात कार्यरत आहे.
जनता कधीही माफ करणार नाही; खाण समर्थकांना इशारा
आदिवासी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत. हा आवाज दाबण्यासाठी काही लोक जनविरोधी काम करत आहेत. त्यांनी स्वतःला आवरावे अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत खाण समर्थकांना नक्षल्यांनी पत्रकातून इशारा दिला आहे.
अपहरण ही केवळ अफवा
एटापल्लीच्या हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाव पाटलाच्या हत्येची घटना घडली आहे. मात्र १० ते १२ लोकांचे अपहरण नक्षलवाद्यांनी केले ही केवळ अफवा आहे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मारेकऱ्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत. योग्य तो तपास करण्यात येईल. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.