कांग्रेसच्या महायज्ञाच्या भीतीने मुख्यमंत्री उद्या गडचिरोलीत
कांग्रेसचा हा डाव त्यांचेवरच उलटवण्यासाठी गडचिरोलीत ; प्रत्यक्ष महायज्ञातूनच प्रकट व्हावे - कांग्रेस
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ जून
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्याकडे ढुंकूनही पहात नाहीत, येथे येऊन समस्या मार्गी लावत नाहीत. त्यामुळे कांग्रेसने ६ जूनला अंततः ‘दर्शन दे गा दे गा देवा भाऊ’ नामक महायज्ञाचे आयोजन केले. मुख्यमंत्री म्हणून आपली आणि सरकारची प्रतिमा वाचवण्याच्या भीतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर ६ जून हीच तारीख निवडून गडचिरोली दौरा आयोजित केला आहे. यामुळे महेंद्र यांची देवेंद्र यांचेशी यज्ञभेट होईल काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यावर देवेंद्रांनी सरळ महायज्ञातच प्रकट व्हावे अशी बोचरी टीका कांग्रेस ने केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या मागास आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून स्वतःची प्रशंसा करून घेतली. मात्र पालकमंत्री पदाचा कारभार ते मुख्यमंत्री कार्यालयातूनच पहात आहेत. कांग्रेस ने पालकमंत्र्यांचे जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करीत राजीनाम्याची मागणीही केली. परंतू फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दाद दिली नाही. परिणामी कांग्रेसने हे अफलातून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. कांग्रेसचा हा डाव त्यांचेवरच उलटवण्यासाठी गडचिरोलीत येऊन विविध कार्यक्रमांत ते सहभागी होणार आहेत.
मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रानटी हत्ती, वाघ, अस्वल यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहेत. शेतीला २४ तास वीजपुरवठा मिळत नाही. अद्याप शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. जिल्ह्यात असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, त्यांना जिल्ह्यासाठी वेळ नाही. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. वारंवार आंदोलन, मागण्या करूनही सर्वसामान्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. आता देवेंद्र गडचिरोलीत प्रकट होऊन या सर्व समस्या कशा मार्गी लावणार याकडे लक्ष लागले आहे.