शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा – जिल्हा कृषी अधिकारी, बसवराज मास्तोळी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० ऑगस्ट
रासायनिक खताचा वापर टाळून नैसर्गीक शेती केल्यास अधिक उत्पादन होऊन आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गीक शेतीचा अवलंब करावा असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सानिमित्य कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली च्या वतीने मंगळवारी नैसर्गीक शेती शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथील विषय विशेषज्ञ एन. पी. बुध्देवार, डी. व्ही. ताथोड, पी.ए. बोथीकर, एस. के. लाकडे, डॉ. पी. एन. चिर्डे, तसेच शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित होते.
विषय विशेषज्ञ (कृषि हवामानशास्त्र) एन. पी. बुध्देवार यांनी आपल्या मार्गदर्शनात धान पिक लागवड तंत्रज्ञान व पिकांची घ्यावयाची काळजी विषयक सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जमीनीची उत्पादकता टिकविण्यासाठी नैसर्गीक रित्या शेती करणे गरजेचे आहे. जेणेकरून याचा फायदा जमीनीची सुपिकता वाढविण्यास होईल व शाश्वत उत्पादन मिळेल असे प्रतिपादन केले.
धान पिकासोबतच भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊन आपले आर्थिक स्तर उंचवावे असे प्रतिपादन विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) एस.के. लाकडे यांनी केले. तसेच भाजीपाला पिकाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर व्ही. ताथोड यांनी मानले. सदर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधु भगिनीं उपस्थित होते.